बारामतीकरांनो, डबलसीट फिरणाऱ्यापूर्वी थोडा विचार कराच...

मिलिंद संगई
Wednesday, 22 July 2020

बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून, दिवसागणिक संख्या वाढू लागली आहे. आज सकाळपासून बारामतीत सात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 

बारामती (पुणे) : बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून, दिवसागणिक संख्या वाढू लागली आहे. आज सकाळपासून बारामतीत सात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पोलिसांनी आता दुचाकीवरुन डबलसीट फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे.

बारामती शहर व तालुक्यातील काल एकूण 69 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एकूण 64 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त झालेल्या अहवालांपैकी बारामती शहरातील दोन व व भिकोबा नगर येथील एक, असे तीन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. बारामतीतील जळोची येथील बागवान वस्तीनजिक 66 वर्षांच्या पुरुषाचा, आमराई परिसरातील 64 वर्षीय ज्येष्ठाचा व भिकोबा नगर येथील या पूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या एका रुग्णाच्या 54 वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या 64 पैकी आज बारामतीमध्ये 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यामुळे कोरोनारुग्णांची संख्या आता 90 वर्यंत जाऊन पोहोचली आहे. 

पोलिस काढणार रेखचित्रातून आरोपींचा माग, पाच दिवसांचा कोर्स

बारामती शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पोलिसांनी आता दुचाकीवरुन डबलसीट फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. गुरुवारपासून (ता. 23) बारामती नगरपालिका व बारामती शहर पोलिसांच्या वतीने विनामास्क व दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाईचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी दिला आहे. दरम्यान चार चाकी वाहनात देखील चालकाव्यतिरिक्त दोनच जणांना प्रवासासाठी परवानगी असेल, त्याहून अधिक लोक चार चाकीमध्ये आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. 

कोणाच्याही संपर्कात नाही तरीही कोरोना पाॅझिटिव्ह

हा निर्णय नागरिकांच्या हितासाठीच घेण्यात आला आहे, त्यामुळे सर्वांनी यास सहकार्य करावे, कारवाईची कटुता येणार नाही, या साठी प्रत्येकाने नियमाचे पालन करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एकाच दिवसात 197 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचेही शिरगावकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action will be taken against those who ride double seats on motorcycles in Baramati