स्वातंत्र्याच्या चौऱ्याहत्तरीनंतरही मिळेना हक्काचा रस्ता; आजारी माणसांना न्यावं लागतंय झोळीतून

रुपेश बुट्टेपाटील
Saturday, 28 November 2020

पावसाळ्यात गुडघाभर चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे. वस्तीकडे जाताना दोन झुऱ्या लागत असल्याने पावसाळ्यात त्याला मोठ्या प्रमाणात पाणी असते अशा वेळी मुलांना खांद्यावर घेऊन पालकांना शाळेत सोडावे लागत आहे.

आंबेठाण (पुणे) : स्वातंत्र्याच्या चौऱ्याहत्तरीनंतरही नागरिकांना हक्काचा रस्ता मिळत नसल्याची दुर्दैवी अन् धक्कादायक बाब समोर येत आहे. वहागाव (ता.खेड) येथील नवाळवाडी या वस्तीला आजही चिखलगाळ तुडवत प्रवास करावा लागत आहे.

आजरी माणसालासुद्धा झोळी करून दवाखान्यात न्यावे लागत असल्याचे दुर्दैव या वस्तीवरील नागरिकांच्या वाट्याला आले आहे. त्यामुळे जर ये-जा करायला रस्ताच नाही, तर याला स्वातंत्र्य तरी कसे म्हणावे? असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत. त्यामुळे 'आम्हाला कोणी रस्ता देता का रस्ता' असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

वहागाव हे तालुक्याच्या पश्चिम भागातील कृषिप्रधान परंतु संवेदनशील गाव. शेती बरोबर दूध व्यवसाय हे येथील ग्रामस्थांचे प्रमुख व्यवसाय. तालुक्यातील एका टोकाला जरी गाव असले तरी येथील नागरिकांनी समाजात घडणारा बदल स्वीकारला आहे. परंतु गावच्या काही लोकवस्त्याना हक्काचा पक्का रस्ता नसणे हे येथील नागरिकांचे दुर्भाग्य आहे. येथील नवाळवस्ती आणि पांगारे वस्तीसह अन्य काही वस्त्यांना आजही पक्क्या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधीचे उंबरे झिजवावे लागत आहे. स्थानिक पंचायत समिती सदस्यांसह खासदारांपर्यंत मागणी करूनही केवळ आश्वासनाशिवाय यांच्या हाताला काही आले नाही. नवाळवाडी रस्त्यासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परिषद शरद बुट्टेपाटील, जि.प.अध्यक्ष निर्मला पानसरे यांना ही निवेदन दिल्याचे माजी उपसरपंच सत्यवान नवले यांनी सांगितले.

लग्न किंवा घरगुती कार्यक्रम करताय? जाणून घ्या, पुणे जिल्ह्यातील नवी नियामवली​

नवाळवाडी अवघ्या १० ते १५ घरांची लोकवस्ती असून पन्नासच्या आसपास लोकसंख्या आहे. वहागावच्या दक्षिणेकडे गावठाणपासून एक किमी अंतरावर ही वस्ती आहे. येथील नागरिकांना आजही शेताच्या बांधावरून ये-जा करावी लागत आहे. दुचाकी कशीबशी येते, पण चारचाकी गाडी जाणे मुश्कील आहे.

पावसाळ्यात गुडघाभर चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे. वस्तीकडे जाताना दोन झुऱ्या लागत असल्याने पावसाळ्यात त्याला मोठ्या प्रमाणात पाणी असते अशा वेळी मुलांना खांद्यावर घेऊन पालकांना शाळेत सोडावे लागत आहे. अशा प्रसंगी लहान मुले अंगणवाडीत येण्यापासून वंचित राहत आहेत. गवळी लोकांना देखील दुधाच्या घागरी डोक्यावर आणाव्या लागत आहे.

आम्ही कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही तरी.. : छगन भुजबळ​

या वस्तीकडे जाण्याच्या मार्गावर असणाऱ्या घरात मागील काही महिन्यांपूर्वी मंजाबाई आनंथा नवले आणि नारायण आनंथा नवले हे मायलेक वादळात घर पडून जखमी झाले होते. त्यावेळी त्यांनाही झोळीतून रोडपर्यंत आणावे लागले होते. दुर्दैवाने त्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी रेऊबाई कोंडीबा नवले या आजारी महिलेला देखील झोळीतून आणावे लागले होते आणि कालच दुर्दैवाने तिचा देखील मृत्यू झाला.

अशीच अवस्था येथील पांगारे वस्ती, शिंदे वस्ती आणि ठाकर वस्तीची आहे. चार पिढ्यापासून हे नागरिक येथे स्थायिक आहेत. जवळपास १५ वर्षांपूर्वी एकदा येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती झाली होती, त्यानंतर दुरावस्था झाली आहे. या भागात डोंगर प्रवाहाचे पाणी येत असल्याने मोऱ्या टाकाव्या, अशी मागणी नवले यांनी केली आहे.

बारामतीकरांनो, जरा जपून! कोरोना वाढतोय​

वारंवार मागणी करून आणि प्रस्ताव देऊन कार्यवाही होत नाही.सर्वच लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून निधी उपलब्ध करून द्यावा आणि नागरिकांना हक्काचा पक्का रस्ता द्यावा.
- सत्यवान नवले, माजी उपसरपंच

स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला रस्ता नाही,शेताच्या बांधावरून जावे लागते.मध्येच दोन झुऱ्या असल्याने पावसाळ्यात मोठी अडचण येत आहे.काही दिवसांपूर्वी आमच्या एका आजीला झोळीतून न्यावे लागले.काल त्या आजीचे निधन झाले.शासनाने आम्हाला पक्का रस्ता द्यावा.
- सुभाष सहादू नवले, ग्रामस्थ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 74 years of independence there is no road to Nawalwadi village in Khed taluka