कामगारांनो, उद्योगांची चाके झाली गतिमान; पुणे विभागात 'अशी' आहे परिस्थिती!

Industry
Industry
Updated on

पुणे : लॉकाडाउनमध्ये शिथिलता आल्यावर कच्चा माल, मनुष्यबळ आदी आव्हाने पार करून उद्योगांची चाके आता गतीमान होऊ लागली आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमधील सुमारे 40 ते 60 टक्के उद्योग आता सुरू झाले आहेत.

राज्यातील उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू होऊ लागले आहेत. पुणे विभागातही महापालिका क्षेत्र वगळता सुरू झालेल्या उद्योगांचे प्रमाण सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोचले आहे. तर, पुणे शहरातील उद्योग क्षमतेच्या सुमारे 40 टक्के सुरू आहेत, अशी जिल्हा उद्योग संचालक कार्यालायकडे नोंद आहे. 

अन्नधान्य वितरण, औषध निर्माण, फाऊंड्री, हातमाग, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी तसेच उत्पादन क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्रही हळूहळू बहरत आहेत. कोल्हापूरमध्ये इचलकरंजी, शिरोली, सांगली, साताऱयात वाई, शिरवळ, फलटण, लोणंद, सोलापूरमध्ये अक्कलकोट रोड, चिंचोलीमधील तर, पुण्यात नऱ्हे, नांदेडफाटा, हडपसर, रामटेकडी, मुंढवा, गुलटेकडी, पर्वती, शिवणे, सिंहगड रोड येथील उद्योग काही प्रमाणात आता सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवडमधील निर्बंध कमी झाल्यामुळे तेथील उद्योगही जोर धरू लागले आहेत. 

ऑर्डर्स हव्या आहेत 
उद्योग सुरू झाल्यावर मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावेल, असा अंदाज होता. परंतु, मनुष्यबळ काही प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहे. मात्र, उद्योगांच्या ऑर्डर्स घटल्या आहेत. उत्पादनांना मागणी कमी असल्यामुळे अनेक कंपन्यांनी मनुष्यबळही कमी केले आहे. पुण्यालगत असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या ऑर्डर्सचा प्रश्न कमालीचा भेडसावत आहे. त्यामुळे मनुष्यबळही कमी झाले आहे.  

उपस्थितीचा प्रश्न निकालात
ग्रामीण भागातील उद्योगांत राज्य सरकारने कामगारांच्या उपस्थितीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे तेथे 100 टक्के उपस्थिती आहे. पिंपरी चिंचवडमध्येही कामगारांची उपस्थिती 70-80 टक्क्यांपर्यंत पोचली आहे. मात्र, पुणे शहर आणि लगतच्या भागात उपस्थिती सध्या 30-40 टक्क्यांपर्यंत आहे. उत्पादनांची मागणी वाढल्यावर कामगारांची उपस्थिती वाढेल, असाही होरा व्यक्त होत आहे. 

वर्क फ्रॉम होमवर भर 
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याची आघाडी आहे. येथील हिंजवडी, मगरपट्टा, खराडी आणि नगर रस्त्यावर आयटीच्या सुमारे 2 हजार कंपन्या आहेत. त्यातील सुमारे साडेचार लाख लोक काम करतात. आयटीमध्ये 50 टक्के उपस्थितीची परवानगी असली तरी, सध्या 1 लाख 25 हजार लोक प्रत्यक्ष कामावर उपस्थित आहेत. उर्वरित सुमारे सव्वा तीन लाख लोक वर्क फ्रॉम करीत आहेत. अजून किमान तीन महिने असेच प्रमाण राहिल, अशी अपेक्षा आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत उद्योग सुमारे 40 ते 60 टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. परराज्यांतील कामगारही काही प्रमाणात परतण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाजारपेठेत मागणी वाढल्यावर अल्पावधीतच उद्योगांमधील उत्पादन प्रक्रिया वेगाने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- सदाशिव सुरवसे, उद्योग, सहसंचालक, पुणे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com