पुन्हा दिसू लागताच 'त्याने' बाळाशी आणि पत्नीशी साधला संवाद; डॉक्टरसुद्धा झाले भावूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

धुमाळ याच्या दोन्ही डोळ्याला अंधत्व आले होते. डोळ्याचा रेटीना (मागील पृष्ठभाग) निघाला होता. आणि त्याला मोतीबिंदू झाला होता.

कोथरुड (पुणे) : आधीच मूकबधीर असलेल्या ३९ वर्षीय अविनाश अनंत धुमाळ यांना दोन्ही डोळ्यांनी दिसणे मुश्किल झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना काय करावे हेच समजत नव्हते. अगोदर त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्रक्रिया केली होती, पण तरीही दिसण्यामध्ये फरक पडला नव्हता.

धुमाळ यांची पत्नी गरोदर होती. त्या पनवेल येथे बाळंतपणासाठी माहेरी गेल्या होत्या. त्यासुद्धा मूकबधीर असल्याने दोघांचाही संवाद मोबाईलवर व्हिडिओ कॉलवर व्हायचा. डोळ्याने दिसणे कमी झाल्याने धुमाळ यांना पत्नीशी संवाद साधता येत नव्हता. दोघेही मूकबधीर असल्याने एकमेकाला व्हिडिओ कॉलवर पाहत हातवारे करुन त्यांचा संवाद व्हायचा. अचानक वाढलेल्या अंधत्वामुळे या संवादात अडथळा निर्माण झाला होता.

भीमनगरमध्ये कोरोनाला रोखण्यात यश; नागरिकांना मोठा दिलासा!​

धुमाळ यांची आई घरकाम करून उपजीविका चालवतात. त्यातच मुलाच्या अंधपणामुळे आता पुढे काय होणार याची त्यांना चिंता होती. काही लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी कोथरुडमधील डॉ. आनंद देशपांडे यांच्याकडे धुमाळ यांना दाखवले. देशपांडे यांनी धुमाळ यांच्यावरील अवघड शस्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आणि धुमाळ यांना दोन्ही डोळ्यांनी दिसू लागले. इकडे त्यांना बाळ झाल्याची दुसरी आनंदवार्ता कळाली. धुमाळ यांनी पत्नी आणि बाळाशी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून डॉक्टरसुद्धा भावनिक झाले.

जुन्या पालखी मार्गाचे काम रखडले; खड्ड्यांमुळे वाहन चालवणे झाले जिकीरीचे!​

डॉ. आनंद देशपांडे म्हणाले की, ''धुमाळ याच्या दोन्ही डोळ्याला अंधत्व आले होते. डोळ्याचा रेटीना (मागील पृष्ठभाग) निघाला होता. आणि त्याला मोतीबिंदू झाला होता. आम्ही सिलिकॉन ऑईल भरून त्याच्या डोळ्यावरील अवघड शस्रक्रिया पूर्ण केली. त्यासाठी त्याला विशिष्ठ अवस्थेत झोपवावे लागते. तो मूकबधीर असल्यामुळे त्याने कसे झोपावे, हे सांगणे अवघड होते, पण खूप प्रयत्नानंतर ते शक्य झाले.

अविनाश हा मूकबधीर असला तरी तो त्याची कामे स्वतःच करत होता. दोन्ही डोळ्याने दिसने बंद झाल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्यामुळे आम्हीसुद्धा चिंतेत पडलो होतो. आता त्याला दिसू लागल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे.
- अलका धुमाळ, अविनाश धुमाळच्या आई

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after successful eye surgery firstly Dhumal interacted with his wife and baby via video call