पुण्यात कसा असणार दहा दिवसांचा लॉकडाऊन; काय राहणार सुरू, काय राहणार बंद?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जुलै 2020

- पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह लगतच्या ग्रामीण भागात निर्बंध
- येत्या सोमवारी रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी
- रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाकडून पुन्हा सोमवारी (ता.१३) मध्यरात्री बारा वाजल्यापासून दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा निर्मूलन बैठक पार पडली. यानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वेब पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

'यहाँ के हम सिकंदर'; 'आयसीएसई'च्या निकालात पुणेकरांनी वाजविला डंका!

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि दोन्ही पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीतील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे असून, हा दहा दिवसांचा लॉकडाउन कडकडीत राहील. येत्या 14 ते 18 जुलैपर्यंतच्या पहिल्या पाच दिवसांत भाजीपाला आणि किराणा दुकाने बंद असतील. केवळ दूध, औषधी दुकाने आणि दवाखाने सुरू असतील. या अत्यावश्यक सोई-सुविधा व्यतिरिक्त स्वच्छता आणि पाणीपुरवठा सेवा सुरू राहील.

19 जुलैनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाईल. लॉकडाऊनच्या शेवटच्या टप्प्यात आढावा घेऊन 24 जुलै रोजी पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पास देण्याची व्यवस्था असेल. नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडायचे असल्यास पोलिस आणि प्रशासनाकडून ऑनलाइन पासची सुविधा पुरवण्यात येणार आहे. या पासशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे : इकडं लॉकडाउन जाहीर झाला; तिकडं गर्दी अन् भाववाढही झाली!​

जिल्हाधिकारी राम म्हणाले, शहरालगतच्या ग्रामीण भागात हवेली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ज्या गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत, अशा 22 गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यात आणखी काही गावांचा समावेश करण्यात येईल. या कालावधीत रुग्णांच्या उपचारासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.

'पुन्हा लॉकडाऊन नको, अन्यथा...'; पुणे व्यापारी महासंघाचं काय आहे म्हणणं?

शेतीविषयक कामे सुरू राहणार : 
जिल्ह्यात उर्वरित भागातही निर्बंध लागू राहतील. परंतु शेतीविषयक कामांना कोणतीही अडचण येणार नाही, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसीबाबत निर्णय दोन दिवसांत :
लॉकडाऊनमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड एमआयडीसीतील उद्योग बंद किंवा सुरू ठेवण्याबाबत उद्योग विभागाशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. तसेच, वृत्तपत्र विक्री आणि वितरणाबाबत शनिवारी निर्णय घेतला जाईल, असे राम यांनी स्पष्ट केले. तर, एमआयडीसी परिसरात पूर्वीच्या लॉकडाऊनप्रमाणे सवलती सुरू राहतील, असे पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अत्यावश्यक वस्तूंची खरेदी : 
अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी प्रशासनाने नागरिकांना रविवार आणि सोमवार हा दोन दिवसांचा अवधी दिला आहे. लॉकडाऊन काळात भाजीपाला, किराणा मिळणार नसल्यामुळे नागरिकांना दोन दिवसांत पुढील दहा दिवसांसाठी लागणारे भाजीपाला, किराणा साहित्य खरेदी करावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

असा राहील लॉकडाऊन : 
- लॉकडाऊनची विस्तृत नियमावली दोन दिवसांत
- 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन 
- लॉकडाऊन दोन टप्प्यांत
-  14 जुलै ते 18 जुलैपर्यंत केवळ औषधे आणि दूध उपलब्ध असणार
- 19 जुलैपासून अत्यावश्यक सेवा दुकाने सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत सुरु
- गरीब नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करणार

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Again a ten day lockdown has been declared by the administration in Pune District