औंधमध्ये रस्ता रुंदीकरणविरोधात स्थानिकांचे आंदोलन

बाबा तारे
सोमवार, 22 मे 2017

पालिका विरुध्द स्थानिक नागरिक यांच्या झालेल्या सुनावणीतही पालिकेने अगोदर स्थानिकांचे पुनर्वसन करुनच हा रस्ता रुंदीकरणाचे काम करावे असा निर्देश पाटील यांनी दिला असल्याचे सचिन कलापुरे यांनी सांगितले.

औंध : येथील राजीव गांधी उड्डाण पुल ते औंध गावठाण हा पालिककेने प्रस्तावित केलेला 120 फूट रस्ता स्थानिकांना विचारात न घेताच केला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यामध्ये स्थानिकांचे घर, दुकाने व हॉटेल आणि 60 वर्षापुर्वीपासून औंधचे वैभव असलेली शिवाजी विद्यामंदिर ही शाळा बाधित होत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची कुठलीही उपाययोजना न करताच पालिकेच्या वतीने शाळा तोडणे व नागरिकांची घरे व दुकाने हटवण्याबाबत कारवाई केली जात आहे. त्यासाठी पालिकेच्या पथविभागाच्या वतीने शाळेच्या प्रांगणात खुणा (डिमार्केशन) सुध्दा केल्या आहेत. परंतु, आधी आमचे पुनर्वसन करा किंवा हा रस्ता 120 फुटांऐवजी 80 फूट करावा या मागणीसाठी स्थानिकांसह, शाळेचे शिक्षक वि विद्यार्थी यांनी आज (सोमवार) सकाळी मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.

यासाठी औंध येथील स्थानिक नागरीक, शिवाजी विद्यामंदिर या शाळेचे शिक्षक,निवृत्त शिक्षक व विद्यार्थी या आंदोलनात सहभागी होते. 1977 ते 1987 हा रस्ता ऐंशी फुट दर्शवला होता परंतु हाच रस्ता कागदोपत्री आता ऐंशी फुटांचा असतांना पालिका कशाच्या आधारावर एकशेवीस फुटाचा रस्ता बनवत आहे असा सवालही नागरीकांनी केला आहे. शनिवारी नगरविकास खात्याचे सहसंचालक अविनाश पाटील यांच्याकडे पालिका विरुध्द स्थानिक नागरिक यांच्या झालेल्या सुनावणीतही पालिकेने अगोदर स्थानिकांचे पुनर्वसन करुनच हा रस्ता रुंदीकरणाचे काम करावे असा निर्देश पाटील यांनी दिला असल्याचे सचिन कलापुरे यांनी सांगितले.

या रस्ता रुंदीकरणाचा फटका येथील स्थानिक दुकानदारांसह शिवाजी विद्यामंदिर या शाळेला प्रामुख्याने बसणार आहे. यात शाळेचे मैदान पूर्णपणे रस्त्यात जाणार आहे. यामुळे जवळपास शाळा व महाविद्यालयातील तीन हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.त्यामुळे येतील ऐंशी फुट जागेतून राजीव गांधी पूल ते ब्रेमेन चौक इथपर्यंत उड्डाणपूल बनवला तर आमची यास काहीही हरकत नाही.यामुळे येथेील वाहतुक कोंडीही कमी होईल व अपघातांचे प्रमाणही कमी होईल अशी सूचनाही नागरीक व शाळेच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे.पालिकेने यावर योग्य विचार केला नाही तर हे आंदोलन अजून तिव्र केले जाणार असल्याचे स्थानिक नागरीक सचिन कलापुरे,सचिन भालेराव व शाळेचे प्राचार्य सुदाम हिरवे यांनी केले आहे.

Web Title: agitation against road widening in aundh