सत्तासंघर्षाचा परिणाम होतोय खडकवासल्याच्या पाण्यावर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पावसामुळे ग्रामीण भागात तलाव, विहिरींमध्ये पुरेसे पाणी आहे. जमिनीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांसाठी आवर्तन देण्यात आलेले नाही. यासंदर्भात बैठक झाल्यानंतर आवर्तन देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- राजेंद्र मोहिते, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग​

पुणे : राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे दुष्परिणाम शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात खडकवासला प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाबाबत होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही. तसेच, साखर कारखान्यांमधील ऊसगाळप हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीचीही बैठक झालेली नाही. त्यामुळे गाळप हंगामासह शहरातील पिण्याच्या आणि शेतीसाठी सिंचनाच्या पाण्याच्या नियोजनाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कालवा सल्लागार समितीकडून खडकवासला प्रकल्पांतर्गत वरसगाव, पानशेत, खडकवाला आणि टेमघर या चार धरणांमधील पाणी वाटपाचे नियोजन केले जाते. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्‍यातील सुमारे ६२ हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येते.

तसेच, पुणे महापालिका, दौंड आणि इंदापूर नगरपालिकांसह औद्योगिक वापरासाठी पाणी दिले जाते. उपलब्ध पाणीसाठ्यानुसार सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येते. परंतु सध्या सरकारच अस्तित्वात नसल्यामुळे कालवा समितीची बैठक अद्याप झालेली नाही.   

राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला- शरद पवार

आवर्तनाचा तपशील
सिंचनासाठी रब्बी आणि उन्हाळी प्रत्येकी दोन आवर्तने देण्यात येतात. रब्बी पिकांसाठी १५ ऑक्‍टोबरपासून ५० दिवस आवर्तन दिले जाते. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा ५० दिवसांचे आवर्तन दिले जाते. तर, उन्हाळी पिकांसाठी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५० दिवसांचे आवर्तन सोडण्यात येते. तसेच, पाण्याच्या उपलब्धतेवर उन्हाळी पिकांसाठी मे महिन्यात आवर्तन दिले जाते.

गाळपाबाबत प्रश्‍नचिन्ह
साखर कारखान्यांमधील गाळप हंगाम ऑक्‍टोबरमध्ये दिवाळीनंतर सुरू होतो; परंतु सत्तेच्या सारीपाटात मंत्री समिती अस्तित्वात आलेली नाही. परिणामी साखर उद्योगावर अवलंबून असलेले ऊसतोड मजूर, ठेकेदार, कामगारांसह अन्य घटकांसमोर प्रश्‍नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे साखर आयुक्‍तालयाच्या पातळीवर गाळप हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. 

उन्हाळ्यात दोन आवर्तने?
यंदा जिल्ह्यात अतिरिक्‍त पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकांसाठी पुरेसे पाणी आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमधील आवर्तन पुढे ढकलले आहे. त्याऐवजी डिसेंबरच्या अखेरीस आवर्तन दिले जाईल. त्यामुळे रब्बी पिकांना दोनऐवजी एकच आवर्तन मिळेल, तर उन्हाळ्यात दोन आवर्तने मिळतील, अशी शक्‍यता आहे; परंतु हे प्रकल्पातील पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture water issue