विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार आहे; पण कुठे होणार...

Ajit-Pawar
Ajit-Pawar

राजगुरुनगर - विमानतळासाठी या वर्षी ५०० कोटी रुपये देणार आहे. विमानतळ पुणे जिल्ह्यातच होणार आहे; पण कुठे होणार ते सांगणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन विमानतळाबाबतचे गूढ बुधवारी वाढविले. पुण्याभोवती पीएमआरडीए आणि रस्ते विकास महामंडळ यांच्यामार्फत दोन रिंगरोड करणार आहे. चाकण व राजगुरुनगरची वाहतूक कोंडी सोडविण्याच्या कामाला गती दिली आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी, दिलीप मोहिते यांची तिसऱ्यांदा आमदारपदी आणि निर्मला पानसरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथे शेतकरी मेळावा आणि जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी पवार बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शिवरायांच्या शिकवणुकीवर महाविकास आघाडीची वाटचाल होत राहणार आहे. महात्मा फुले कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात २ लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. विमानतळासाठी जमीन संपादन करताना रेडी रेकनरच्या चौपट नुकसानभरपाई देणार आहोत.’’

दादागिरी केल्यास मोका
कारखान्याचा मालकही टिकला पाहिजे आणि कामगारही जगला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. कामगारांची पिळवणूक करता काम नये, तसेच उद्योगपती बाहेर जाऊन चालणार नाही. जिल्ह्यात उद्योगांना पोषक वातावरण असले पाहिजे. कारखानदारांनी दादागिरी केली किंवा दहशत दाखविली तर कोणीही असला तरी मी हयगय करणार नाही. संबंधिताला मोका लावणार, असा इशाराही पवार यांनी दिला. 

संत तुकाराम कारखानावाले खेड तालुक्‍याला सवतीच्या पोरासारखे वागवतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नाना नवलेंनी वेगवेगळ्या पक्षांतून स्वतःचेच नातेवाईक घुसविले, त्यामुळे या वर्षी आम्ही कारखान्याला ऊस घालणार नाही, असा इशारा मोहितेंनी या वेळी दिला.

पंचायत समितीची इमारत त्याच आवारात व्हावी, एवढेच माझे म्हणणे आहे, त्यासाठी माजी आमदारांनी आंदोलनाची गरज नव्हती; पण शिवसेनेला जुन्या सवयी मोडवत नाहीत. स्टंटबाजी करायची आणि दाखवायचं की आम्हाला किती काळजी आहे. सेनेचाच मुख्यमंत्री आहे, हे त्यांना माहीत आहे की माहीत नाही? राजकारण गढूळ करू नये अशी माझी सेनेला विनंती आहे, असे या वेळी बोलताना मोहिते म्हणाले. 

प्रास्ताविक कैलास सांडभोर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी केले. बाजार समितीचे सभापती बाळ ठाकूर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com