esakal | डिपॉझिट जप्त झालेल्यांबाबत काय बोलणार? - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

डिपॉझिट जप्त झालेल्यांबाबत काय बोलणार? - अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. बारामतीकरांनी ज्यांचे डिपॉझिट जप्त (Deposit Seized) केले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार? त्यांची योग्यता बारामतीकरांनी मागील निवडणुकीतच (Election) ओळखली आहे,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर बोचरी टीका केली. (Ajit Pawar Comment of Gopichand Padalkar Politics)

विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी बारामती दौऱ्यावर असताना पडळकर यांनी ‘बारामतीच्या जनतेने पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे. तसेच, पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार शाहू-फुले-आंबेडकर यांच्या वारसदारांच्या संवैधानिक हक्कावर गदा आणण्याचे काम करीत आहे,’ अशी टीका केली होती. या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्याबद्दल काय बोलणार? शिवाय, त्यांची योग्यता बारामतीकरांनी मागील विधानसभा निवडणुकीतच ओळखली आहे.’

हेही वाचा: राष्ट्रवादीत नव्या कार्यकर्त्यांना मिळणार संधी - अजित पवार

नीलेश राणे यांच्यावर टीका

उस्मानाबाद येथे सलामी नाकारल्यावरून नीलेश राणे यांनी अजित पवार त्यांच्यावर टीका केली. त्यावर ‘पाऊस असल्यामुळे सलामी नाकारली. ज्यांना काही उद्योग नाहीना... टीका कोण करतंय, ती व्यक्ती कोण आहे, त्यावर टीकेला महत्त्व असते. त्याच्या टीकेला कोण लक्ष देतंय,’ अशा शब्दांत पवार यांनी नीलेश राणे यांच्यावर टीका केली.

प्रत्येकाला पक्ष वाढविण्याची मुभा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे वक्तव्य केले होते. या संदर्भात पवार म्हणाले, ‘निवडणुका लागतील त्यावेळी कोणाकोणाची आघाडी आणि युती आहे, हे व्यवस्थित सांगेन. प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:चा पक्ष वाढविण्याची मुभा आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचे कामकाज ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’नुसार व्यवस्थित सुरू आहे.’

हेही वाचा: पुण्याबाहेर गेल्यास, करावं लागेल होम क्वारंटाईन : उपमुख्यमंत्री

पीककर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई

शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याबाबत राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे देऊनही पीककर्ज न दिल्यास संबंधित बॅंकांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले.

तर सोसायट्यांमध्येही लसीकरण

गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे, ही बाब पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेलाही मान्य आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर लसी प्राप्त झाल्यास सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्यात येईल. सध्या कोरोना योद्धे आणि दिव्यांगांना लसीकरण करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

loading image