esakal | पुण्याबाहेर गेल्यास, करावं लागेल होम क्वारंटाईन : उपमुख्यमंत्र्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

- शहरात शनिवार, रविवारी कडक निर्बंध

- पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात देखील निर्बंध 'जैसे थे'

- पर्यटनासाठी गर्दी टाळा अन्यथा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइनचा इशारा

पुण्याबाहेर गेल्यास, करावं लागेल होम क्वारंटाईन : उपमुख्यमंत्री

sakal_logo
By
अनिल सावळे

पुणे : शहरात शनिवार आणि रविवारी विकेंडला कडक निर्बंध राहतील. या दोन दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील बाधित रुग्ण दर कमी न झाल्यामुळे निर्बंध कायम राहतील. नागरिकांनी पर्यटनासाठी गर्दी करू नये. अन्यथा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाइन करावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.(Ajit Pawar Warn Home Quarantine to citizens going out of the district)

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा: पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; अजित पवार यांचा इशारा

पवार म्हणाले, ''अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेले असताना तेथे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 53 टक्के लोकांचा मृत्यू हा साठ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील लोकांचा झाला आहे. त्यापैकी 20 टक्के मृत्यू 30 ते 45 वयोगटातील आहेत. त्यामुळे तरुण-तरुणींनीही गांभीर्याने घेतले पाहिजे. पुणे महापालिकेकडूनही अशा स्वरूपाचा अहवाल मागवला आहे.''

काहीजण पुण्यातून महाबळेश्वर तसेच परराज्यात फिरण्यासाठी किंवा देवदर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी परराज्यांत गेलेल्या नागरिकांना पुण्यात आल्यानंतर 15 दिवस विलगीकरणात ठेवावे लागेल.

हेही वाचा: Corona: पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून राहणार बंद

''केंद्र सरकारने 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना लसीकरणाचे नियोजन केले आहे. या संदर्भात पुणे जिल्ह्यात दररोज दीड लाख लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु केंद्र सरकारकडून अद्याप लस प्राप्त झालेली नाही. मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर हे लसीकरण करणे शक्य होईल. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही जाऊन लस देता येईल.''

''जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशील्ड लस घेतलेल्या व्यक्तींना परदेशी जाण्यास परवानगी दिली आहे. परंतु कोव्हक्सिनची लस घेतलेल्या व्यक्तींना परवानगी नाही. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोव्हक्सिनची लस घेतल्यानंतर परदेशी जाण्यासाठी पुन्हा कोव्हिशील्डची लस घेऊ नये,'' असे तज्ज्ञांचे मत असल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे दुसऱ्या टप्प्यात; काय आहेत निर्बंध? महापौरांनी दिली माहिती

बहीरवाडी संपूर्ण लसीकरणामध्ये देशातील पहिले गाव :

पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गावात संपूर्ण लसीकरण झाले आहे. देशातील हे पहिले असे गाव असून, या गावातील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे, असे पवार यांनी सांगितले.

आषाढी वारीबाबत मार्ग निघेल :

पंढरपूरच्या आषाढी वारी बाबत यापूर्वीच आदेश काढण्यात आले आहेत. मात्र वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींसोबत अद्याप विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांची चर्चा सुरू असून, लवकरच मार्ग काढण्यात येईल. वारीबाबत गतवर्षीच्या तुलनेत असलेल्या निर्बंधाच्या तुलनेत काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

loading image
go to top