esakal | पूलांच्या दुरुस्तीसह पिकांचे पंचनामे तातडीने करा- अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

आज बारामती शहर व तालुक्यात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत पवार यांनी नुकसानीची पाहणी केली.

पूलांच्या दुरुस्तीसह पिकांचे पंचनामे तातडीने करा- अजित पवार

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती, ता. 17- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर बारामती तालुक्यातील अनेक पूलांचे तसेच शेतीचेही नुकसान झाले आहे. पूर आल्याने अनेकांचे नुकसान झाले असून प्रशासकीय स्तरावर पूलांची दुरुस्ती, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे व लोकांना मदतीसाठी पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 

आज बारामती शहर व तालुक्यात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत पवार यांनी नुकसानीची पाहणी केली. लोकांशी संवाद साधत त्यांनी अधिका-यांना जागेवरच अनेक सूचना दिल्या. सकाळी सातच्या सुमारास शहरातील भिगवण रस्त्यावरुन बाधित क्षेत्राची पहाणी करण्यास त्यांनी सुरुवात केली. भिगवण रस्त्यावरील अमरदीप हॉटेल, तांदुळवाडी भागातील वृध्दाश्रम, पंपहाऊस येथील चांदगुडे वस्ती, कऱ्हानदीवरील खंडोबा नगर  पूल, कऱ्हावागज-अंजनगाव पूल आणि बंधारा, बारामती-फलटण रोडवरील पाहुणेवाडी, गुणवडी आणि इंदापूर ओढ्यावरील पुलाच्या परिसराची पहाणी केली.

हेही वाचा - भोर शहर बनले अनाधिकृत बांधकामांचे माहेरघर

आगामी दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. पुढील काळात पुरस्थिती टाळण्यासाठी नदीचे खोलीकरण करणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठावरील अतिक्रमण हटविणे, नदीच्या आणि ओढ्याच्या काठी पूररेषेच्या आत अतिक्रमणे होणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

बारामती तालुक्यातील कऱ्हावागज-अंजनगाव येथील बंधाऱ्याजवळील पुलाचा भराव खचला आहे. तसेच बारामती-फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील रस्त्याचा भराव खचला असून या दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणची दुरुस्तीची कामे तातडीने करुन याठिकाणची वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या.  पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

हेही वाचा - पुण्यात थरार! नांदेड फाटा येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह


यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, उपविभागीय अभियंता विश्वास ओव्हाळ, गटनेते सचिन सातव आदी उपस्थित होते.