आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे खुले झाले महाद्वार

The Alandi temple has been opened for Darshan after eight months.jpg
The Alandi temple has been opened for Darshan after eight months.jpg

आळंदी (पुणे)  : पहाटेची बोचरी थंडी, सनई चौघड्याचे मंजूळ स्वर. अशा भरलेल्या वातावरणात माऊलींच्या समाधीवर पवमान पूजा आणि दुधारती झाल्यावर ठिक सहाला संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे महाद्वार उघडण्यात आले. यावेळी आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर देवूळ उघडल्याचा आनंद व्यक्त करत भाविकांनी भुईनळ्यांची आतिषबाजी आणि माऊलीचा गजर करत देवूळवाड्यात दर्शनासाठी प्रवेश केला. माऊलींच्या समाधीचे रूप पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. कोरोनाची पार्श्वभूमी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्र आल्याने प्रतिवर्षीच्या तुलनेत दर्शनासाठीची गर्दीला थंड प्रतिसाद होता.

प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय झाला आणि भाविकांमधे आनंदाचे वातावरण होते. देवूळवाडा देवस्थानच्यावतीने कालपासूनच मंदिरे स्वच्छ करण्यास सुरूवात केली होती. आज पहाटे साडे चार ते साडे पाच माऊलींच्या समाधीवर पवमानपूजा आणि दुधारती झाली. मग लगबल सुरू झाली ती दर्शनासाठीची. आजोळघरातून दर्शनाची रांग सुरू केली. पान दरावाजातून दर्शन झाल्यावर बाहेर पडण्याची सोय केली होती. महाद्वारातून मुख दर्शनाची सोय केली होती. तिनही दरवाजावर पोलिसांचा बंदोबस्त होता. पहाटेपासून भाविक महाद्वारात माऊलींच्या समाधी दर्शनाची आस लावून होते. ठिक सहाला महाद्वार दरवाजा उघडला आणि भाविकांनी माऊली माऊलीचा गजर केला.

काहींनी भुईनळ्यांची आतिषबाजीही केली. आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर दर्शन होणार असल्याने अनेकांचे आनंदाश्रू तरळत होते. दर्शनानंतर स्वतःला धन्य मानून भाविक देवूळवाड्यातून बाहेर पडत होता. देवूळवाड्यात देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.अभय टिळक, योगेश देसाई, आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ट पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे, राजाभाऊ चोपदार, ज्ञानेश्वर वीर, मच्छिंद्र शेंडे, कांचन पंडित, राजाभाऊ चौधरी यांची दर्शनासाठी भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी बंदोबस्त आणि स्वच्छतेबाबत खबरदारी घेत होते. मंदिरात प्रवेश करताना सॅनिटायझर आणि थर्मलगनद्वारे तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. मात्र दिवाळी पाडवा, भाऊबीज एकत्र आल्याने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर देऊळ उघडले तरी दर्शनाला प्रतिसाद प्रतिवर्षीपेक्षा थंड होता.

महाद्वारातील व्यापा-यांमधे उत्साह

सगळ्या प्रकारचे धंदे व्यवसाय सुरू झाले. मात्र देवूळ बंद असल्याने दुकान उघडे असूनही फायदा नव्हता. कारण भाविकच येणार नाही म्हटल्यावर धंदा कुठून होणार. अनेकांनी चाकण एमआयडीसीचा मार्ग धऱला. मात्र देवूळ उघडणार म्हटल्यावर मंदिर परिसरातील व्यापा-यांची लगबग सुरू झाली. आज सकाळपासून प्रसाद विक्रीसाठी अनेक व्यावसायिक पहाटेपासूनच हजर होते. महाद्वारातील व्यापा-यांना पुन्हा पूर्वीसारखे सुगीचे दिवस आले. दुरूनच दर्शन असल्याने पान फूलचा व्यवसाय झाला नाही. मात्र प्रसाद विक्री जोरात होती.

पोलिसांनी मंदिर परिसरात दिल्या नोटीसा

दुकानात भाविकांचे सामान ठेवून घेवू नये. गर्दी करू नये. मास्क वापरणे. फेस शिल्ड दुकानदारांना बंधनकारक असून सॅनिटायझरचा वापर वारंवार करण्याबाबत पोलिसांनी व्यावसायिकांना सुचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com