#PuneRains : घोडनदी काठच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा

विवेक शिंदे
Thursday, 15 October 2020

-घोडनदी काठच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,’’ अशी माहिती डिंभे धरणाचे कार्यकारी अभियंता तान्हाजी चिखले यांनी दिली. 

महाळुंगे पडवळ : ‘‘आंबेगाव तालुक्यात हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. गुरुवारी (ता.१५) पहाटे धरणातून घोडनदी पात्रात पाच हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली असून घोडनदी काठच्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,’’ अशी माहिती डिंभे धरणाचे कार्यकारी अभियंता तान्हाजी चिखले यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हुतात्मा बाबू गेनू सागर १०० टक्के भरले होते. तसेच तालुक्यात पाऊसही उघडला होता. त्यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोडनदीवर असलेल्या कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांना ढापे बसविण्यात सुरु केली होती. चांडोली बुद्रूक, कळंब व वडगाव काशिंबेग येथील बंधाऱ्यांना ढापे बसविण्याचे काम प्रगतिपथावर होते. परंतु बुधवारी दुपारनंतर आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला. डिंभे धरणातून घोडनदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे घोडनदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तुडुंब भरून अतिरिक्त पाणी ढाप्यांवरुन जात असल्याने बंधारे फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी बंधाऱ्याचे ढापे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता दत्तात्रेय कोकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ते म्हणाले, ‘‘चांडोली बुद्रूक, कळंब, वडगाव काशिंबेग आदी बंधाऱ्यांचे ढापे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करून देण्याचे काम कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.’’

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alert to 35 villages in Ambegaon and Shirur talukas on the banks of Ghodnadi river