आंबेगावात कोरोनाला रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेणार 

डी. के. वळसे पाटील
सोमवार, 1 जून 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनाच्या अनुषंगाने मंचर (ता. आंबेगाव) येथे खासगी डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर वळसे पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्षभराच्या नियोजनाचा आराखडा तयार करावा. रुग्णांच्या व्यवस्थेसाठी खासगी डॉक्टर व हॉस्पिटलची मदत घेतली जाईल. सरकारबरोबर करार करून त्यांना नियमानुसार आर्थिक मोबदलाही दिला जाईल. या कामाच्या नियोजनासाठी खासगी डॉक्टरचे प्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल तयार करून पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठवावे, असे आदेश कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

आणखी वाचा - शरद पवार यांनी गाठलं कार्यकर्त्याचं घर; वाचा बातमी
 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनाच्या अनुषंगाने मंचर (ता. आंबेगाव) येथे खासगी डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर वळसे पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या वेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आयुष प्रसाद, आंबेगाव- जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. चंदाराणी पाटील, डॉ. मोहन साळी, डॉ. सुदाम खिलारी, डॉ. सुनील खिंवसरा, डॉ. वर्षराणी गाडे, डॉ. आशिष पोखरकर, डॉ. भूषण साळी, डॉ. लीना गुजराथी यांच्यासह ७० खासगी डॉक्टरांनी चर्चेत भाग घेतला.

आणखी वाचा - पुणेकरांनो तुमचं फेसबुक हॅक होऊ शकतं

खासगी हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्णांचे नमुने घेण्यास परवानगी द्यावी. सरकारी हॉस्पिटलमध्ये किवा शासनाने ताब्यात घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी डॉक्टरांना व त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण मिळावे. दुर्दैवाने डॉक्टर किवा त्यांचे कुटुंबीय बाधित झाल्यास संबंधितावर मोफत उपचार झाले पाहिजेत. वयाच्या ५५ पुढील डॉक्टराचा या उपचार प्रक्रियेत समावेश करू नये. गेल्या दोन महिन्यांपासून सर्व प्रकारच्या शास्त्रक्रिया थांबविल्या आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर जर पाँझिटिव्ह रुग्ण आढळून आला, तर शासनाचे धोरण काय राहील. मुंबईवरून गावी आलेल्या नागरिकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानाही मानसिक आधार देण्यासाठी उपाय योजना करावी. पावसाळा सुरु झाल्यामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गरीब रुग्णांवर उपचार होण्यासाठी खासगी दवाखान्यातही सर्पदंश प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा. आदी मागण्या डॉ. सदानंद राऊत, डॉ. सचिन गाडे, डॉ. नरेंद लोहकरे, डॉ. विनायक खेडकर, डॉ. ओंकार काजळे, डॉ. सागर गुजराथी, डॉ. शिल्पा कडधेकर, डॉ. संतोष शिंदे यांनी केल्या.
    

पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या वेळी आयुष प्रसाद यांनी कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पुढाकार घेत असलेल्या खासगी डॉक्टरांचे कौतुक केले. ते म्हणाले, आंबेगाव तालुक्यात मुंबईवरून आलेल्या रुग्णांची संख्या १० हजार झाली आहे. संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढेकळे यांच्याशी खासगी संपर्क करा. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या खासगी डॉक्टरांना प्रशासनामार्फत सर्व सहकार्य केले जाईल.

वळसे पाटील म्हणाले, शासकीय यंत्रणा पुरी पडत नाही. त्यासाठी खासगी डॉक्टरांचे सहकार्ये घेतले जात आहे. डॉ. सचिन गाडे, डॉ. विनायक खेडकर यांनी पुढाकार घेऊन डॉक्टरांची समिती नेमावी. भीमाशंकर कारखान्यामार्फत यापूर्वीही मास्क, सँनिटायझर, पीपीई कीट उपलब्ध करून दिले आहेत. यापुढेही वैद्यकीय साहित्य पुरविले जाईल. देवेंद्र शहा व प्रशासनातील सर्व अधिकारी अहोरात्र काम करत आहेत. उपाययोजनांबाबत काही सूचना असल्यास थेट माझ्याशी डॉक्टरांनी संपर्क साधावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ambegaon taluka, the help of private doctors will be sought to prevent corona