बाप रे...बंधाऱ्यावरून नदीत कोसळला ट्रक, त्यात होते... 

सुदाम बिडकर
शनिवार, 23 मे 2020

काठापूर बुद्रूक येथील घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून बेकायदेशीर मातीची वाहतूक करणारा हायवा ट्रक नदीत कोसळल्याने बंधाऱ्याचे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील काठापूर बुद्रूक येथील घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून बेकायदेशीर मातीची वाहतूक करणारा हायवा ट्रक नदीत कोसळल्याने बंधाऱ्याचे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने ट्रक चालकाला तत्परतेने पाण्याच्या बाहेर काढल्याने तो बचावला आहे. 

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका  

या बंधाऱ्यावरून रात्रीच्या वेळी बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणावर वाळू, मुरूम, मातीची जड वाहतूक होत आहे. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्यावर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला तडे गेले आहेत. काल पहाटे तीन वाजता मोठा आवाज झाल्याने स्थानिक ग्रामस्थ जागे झाले. त्यावेळी ट्रक नदीत कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. या ट्रकबरोबर अजून काही ट्रक होते. त्या ट्रकमधील चालकांनी कोसळलेल्या ट्रकमधील चालकाला बाहेर काढले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. परंतु, बंधाऱ्याचे व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

माळेगाव कारखान्यातील अपघाताची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल   

रात्रीच्या वेळी माती मुरूम आणि वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक बंधाऱ्यावरून होत असते. काठापूर बुद्रूक आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वेकडील; तर नदी पलीकडील काठापूर खुर्द हे शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन्ही तालुक्‍यांच्या सीमा एकत्र येत आहेत. त्यातून प्रशासनाचे येथे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या परिसरात माती, मुरूम व वाळूची चोरी व वाहतूक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक थांबवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतीने मोठ्या वाहनांना अडथळा होईल, असे उपाय करणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambegoan-The truck crashed into the river from the embankment