esakal | पश्चिम बंगालमध्ये वाढली रुग्णसंख्या; कोरोनाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचा शहांचा निर्वाळा
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम बंगालमध्ये वाढली रुग्णसंख्या; कोरोनाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचा शहांचा निर्वाळा

पश्चिम बंगालमध्ये वाढली रुग्णसंख्या; कोरोनाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचा शहांचा निर्वाळा

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कोलकाता : देशात सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरु आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी, केरळ आणि तमिळनाडू याठिकाणी या निवडणुका पार पडत आहेत. त्यातल्या त्यात अगदी चुरशीची लढत होत आहे ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. या ठिकाणी सत्ता स्थापन व्हावी म्हणून भाजप आपल्या जीवाचं रान करत आहे. पंतप्रधान मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत भाजपच्या सगळ्या स्टार प्रचारकांनी पश्चिम बंगालमध्ये मोठमोठाल्या जनसभा तसेच प्रचार रॅली काढल्या आहेत आणि त्या आजही सुरु आहेत. एकीकडे देशात कोरोनाचा कहर पहायला मिळत असताना दुसरीकडे निवडणुकांमध्ये नेते मश्गुल असलेले पहायला मिळत आहेत. तर देशात गेल्या तीन दिवसांपासून दोन लाखांच्यावर दैनंदिन रुग्णसंख्या आढळत आहे.

निवडणुकीत कोरोना धाब्यावर

खुद्द पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांच्या प्रचारसभांना तसेच रोड शोला देखील कसल्याही कोरोना नियमांचं पालन केलं जात असल्याचं दिसत नाहीये. सोशल डिस्टन्सिंग तर नाहीच मास्क देखील लावला जात नाहीये. याचं पालन गृहमंत्री अमित शहा देखील करताना दिसत नाहीयेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विशेष नियमावली जाहीर केली असून ती नियमावली थेट धाब्यावरच बसवल्याचं विदारक चित्र आहे.

हेही वाचा: पुण्यात रक्तदानाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद; प्लाझ्मा दानातून रुग्णांना जीवदान

हेही वाचा: कोरोनाच्या संकटात रतन टाटांचा पुन्हा मदतीचा हात; ऑक्सिजनचा करणार पुरवठा

पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्ण वाढले

काल पश्चिम बंगालमध्ये नवे 7,713 रुग्ण सापडले आहेत तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल हाबरामध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा मोठा रोड शो झालेला पहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने निवडणुका नसलेल्या राज्यांमध्ये देखील हाहाकार माजवला आहे. त्यामुळे याला निवडणुकांशी जोडणं योग्य ठरणार नाही. तसेच सध्या देशव्यापी लॉकडाऊन लावण्याची काहीही गडबड नाहीये.

कोरोनाला निवडणुकांशी जोडू नका - शहा

एकीकडे कोरोनाची परिस्थिती आणि दुसरीकडे लाखोंच्या जनसभा याबाबत विचारले असता गृहमंत्री म्हणाले की, हे बघा, महाराष्ट्रात निवडणुका आहेत का? तिथे 60 हजार केसेस आहेत तर इथे 4 हजार आहेत. महाराष्ट्रासाठी माझ्या हृदयात अनुकंपा आहे आणि बंगालसाठी देखील आहे. याला निवडणुकीशी जोडणं योग्य नाहीये. कारण जिथे निवडणुका नाहीयेत तिथे कोरोना वाढलाय. याला तुम्ही काय म्हणाल?

राहुल गांधींचा निर्णय

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जाहीर करत विरोधकांना देखील आवाहन केलं आहे. श्चिम बंगालमध्ये पुढील टप्प्यांतील मतदानासाठी प्रचार सभा न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं सांगत त्यांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत. तसेच त्यांनी राजकीय पक्षांना यावर विचार करण्याचा सल्ला दिला आहे. ट्विट करुन राहुल गांधी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कुंभमेळा आटोपण्याचं मोदींचं उशीरा आवाहन

हरिद्वारच्या कुंभमेळ्यामुळे उत्तराखंडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे आणि त्यानंतर जागं झालेल्या शासनाने आता कुंभमेळा आवरता घेण्याचं आवाहन केलं आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनी देखील आता कुंभमेळा प्रतिकात्मक व्हावा, असं ट्विटरवर सल्ला दिला आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रतिकात्मक व्हावा. यामुळे कोरोनाच्या लढ्याला बळ मिळेल. आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवर चर्चा झाली. सर्व संत, महंतांच्या आरोग्याचीही माहिती घेतली. तसंच प्रशासनाला त्यांच्याकडून सहकार्य केलं जात आहे. यासाठी संतांचे आभारही मानल्याचं मोदींनी सांगितलं.

हेही वाचा: कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?

देशात काल 2.60 लाख रुग्ण

गेल्या 24 तासात भारतात तब्बल 2 लाख 61 हजार 500 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात 1 लाख 38 हजार 423 जण कोरोनामुक्त झाले. शनिवारी (ता.17) 1 हजार 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला एका दिवसात सर्वाधिक 1290 मृत्यू झाले होते. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 47 लाख 88 हजार 109 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 1 कोटी 28 लाख 9 हजार 643 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ही 18 लाख 1 हजार 316 असून आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 77 हजार 150 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच आतापर्यंत 12 कोटी 26 लाख 22 हजार 590 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.