esakal | पुण्यात रक्तदानाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद; प्लाझ्मा दानातून रुग्णांना जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

blood donation

पुण्यात रक्तदानाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद; प्लाझ्मा दानातून रुग्णांना जीवदान

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे- कोरोना काळात भासत असलेली रक्ताची गरज आणि राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – जनकल्याण समिती व समर्थ भारत अभियानातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांत विविध आठ भागांमध्ये झालेल्या एकूण २६ रक्तदान शिबिरांमधून १ हजार २४० रक्तपिशव्यांचे संकलन झाले. तर प्लाझ्मा दानासाठी होत असलेल्या प्रयत्नांमधून आतापर्यंत सहाशेहून अधिक जणांनी प्लाझ्मा दान केले. त्यातून १ हजार ५०० हून अधिक गंभीर रूग्णांना जीवदान मिळाले. या रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी शहरातील विविध १२ रक्तपेंढींची मदत झाली. रक्तदान शिबिरांसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध गणेश मंडळ, मंदिर विश्वस्त मंडळ व त्यांचे कार्येकर्ते, सेवाभावी व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनकल्याण समिती व समर्थ भारतच्या मदतीने शिबिराचे आयोजन केले.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात दिवसातील नवे रुग्ण १३ हजारांच्या घरात

शहरात पुढील दोन महिन्यात रक्ताची आणखी गरज भासू शकते, तेव्हा पुणे शहरातील तसेच राज्यातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी विविध संस्था संघटना, मंडळ, सार्वजनिक ट्रस्ट, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या रक्तदानाच्या महाअभियानात सामील‌ व्हावे,असे आवाहन समर्थ भारतचे संयोजक सचिन भोसले व सहसंयोजक रवी शिंगणापुरकर यांनी केले. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य घालून दिलेले सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे व सर्व नागरिकांनी काळजी घेत या रक्तदान यज्ञात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात करण्यात आले आहे.

हेही वाचा: कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?

प्लाझ्मा दानातून पंधराशेहून अधिक रूग्णांना जीवदान

काही गंभीर कोरोना रूग्णांसाठी प्लाझ्मा वरदान ठरते आहे. त्याअनुषंगाने कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लाझ्मा दान करावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व समर्थ भारततर्फे संपूर्ण पुणे महानगरात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. कोरोना होवून गेलेल्या रूग्ण नागरिकांशी फोनद्वारे संपर्क करून त्यांना प्लाझ्मा दानासाठी आवाहन करण्यात आले. त्यात आतापर्यंत सहाशेंहून अधिक जणांनी प्लाझ्मा दान केले. या प्लाझ्मा दानातून १ हजार ५०० हून अधिक गंभीर कोरोना रूग्णांना जीवदान मिळाले आहे. कोरोना रूग्णांच्या संपर्कासाठी व आवाहनासाठी तरूण – तरूणी, डॉक्टर, सामाजिक संस्था संघटनां व त्यांचे कार्यकर्त्यांची मोलाची सहकार्य मिळत आहे, अशी माहिती जनकल्याण समिती व समर्थ भारततर्फे देण्यात आली.