पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता; तर जिल्ह्याची जबाबदारी अभिनव देशमुखांकडे!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

पुण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची नियुक्ती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. देशमुख यांच्या नियुक्तीने त्यास आता पूर्णविराम मिळाला आहे.

पुणे : राज्यातील बहुचर्चित पोलीस बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला असून पुण्याच्या पोलीस आयुक्त पदी गृहमंत्रालयातील प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची निवड झाली आहे, तर पुण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी कोल्हापूर ग्रामीणचे अधीक्षक अभिनव देशमुख यांची नियुक्ती झाली आहे.

राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या सहा अधिकाऱ्यांच्या आणि अधीक्षक दर्जाच्या 22 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी (ता.१७) रात्री उशिरा जाहीर केले. पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली, असे यापूर्वीच सांगण्यात येत होते. तसेच पुण्याच्या आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची निवड होणार आहे, असे वृत्त 'सकाळ'ने यापूर्वीच दिले होते. ते गुरुवारी राज्य सरकारच्या आदेशाने खरे ठरले.

दारुड्यांची गर्दी खेचणाऱ्या 'वाईन शॉप'ला अतिरिक्त आयुक्तांनी ठोकले टाळे​

पुण्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची नियुक्ती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. देशमुख यांच्या नियुक्तीने त्यास आता पूर्णविराम मिळाला आहे. के. वेंकटेशम यांची पुण्यातील सुमारे तीन वर्षांची कारकिर्द चांगल्या पद्धतीने झाली. त्यांनी पोलिस यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, तसेच अवैध धंद्यांवर ही मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळविले होते. पोलीस आयुक्तालयातील इमारतींचे बांधकाम करण्यापासून सुशोभीकरण करण्यापर्यंत अनेक कामे त्यांनी केली होती.

एल्गार परिषदेतील आरोपींना अटक करून त्याबद्दल पुरावे गोळा करून त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही मांडले होते. वेंकटेशम यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले. तसेच एल्गार परिषदेच्या माध्यमातून शहरी नक्षलवादाचा मुद्दाही त्यामुळे चर्चेत आला होता, त्याचा तपास त्यांनी यशस्वीपणे केल्याचा दाखला न्यायालयाने दिला आहे. नक्षलवाद विरोधी मोहिमेत विशेष अभियानात त्यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.  

'तुझी लाज वाटते कंगना'; लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकरांचं ट्विट व्हायरल

संदीप पाटील यांचीही कारकीर्द पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने झाली होती. त्यांनी स्वेच्छेने गडचिरोली परिक्षेत्राची जबाबदारी मागितली होती ती राज्य सरकारने पूर्ण केली. गुप्ता यांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आग्रही होते, असे समजते. पुण्यात यापूर्वी काम केलेले मनोज पाटील यांची नियुक्ती सोलापूर ग्रामीणमधून नगर जिल्हा पोलिस अधीक्षकपदी झाली आहे, तर पुण्यातील तत्कालीन वाहतूक पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची जळगावच्या जिल्हा अधीक्षकक्षपदी नियुक्ती झाली आहे. पुणे शहरात गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेले विक्रम देशमाने यांची ठाणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी निवड झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitabh Gupta appointed as Commissioner of Police while Abhinav Deshmukh as District Superintendent of Police