

फोटो ः NGP26I34808
प्रा. अनिल सोले.
उमेदवारी न मिळाल्याने
भाजपमध्ये बंडाचा झेंडा
नागपूर पदवीधर मतदारसंघ : अनिल सोले, रमण सेनाड उद्या अर्ज भरणार
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ४ : भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली. पक्षाच्या या निर्णयाविरुद्ध माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी बंडाचे निशाण फडकावले असून, सोमवारी दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली. त्यांच्या पाठोपाठ लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष ॲड. रमण सेनाड हेही अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत.
पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी सोले आणि सेनाड यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र, पक्षाने कोहळेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने दोघांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी सोपवल्यानंतर सोले यांनी भाजपचा हा पारंपरिक गड मजबूत केला होता. सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देता संदीप जोशी यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा सोले यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. उमेदवारी नाकारल्याने आता सोले यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उमेदवारी अर्ज भरत असल्याचे ‘सोशल मिडिया’वर जाहीर केले.
वर्षभरापासून कोहळे यांच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू असताना सोले यांनीही समर्थकांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली होती. आता त्यांच्या बंडामुळे भाजपसमोर निवडणुकीपूर्वीच मोठे आव्हान उभे राहिले आहे. वरिष्ठ नेते बंडखोरी शमविण्यात यशस्वी ठरतात की सोले यांची भूमिका कायम राहते, याकडे संबंधित वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.