बारामतीकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीचा मोठा साठा असणाऱ्या 'नटराज'ची चार दशकांची वाटचाल

बारामतीकरांसाठी सांस्कृतिक मेजवानीचा मोठा साठा असणाऱ्या 'नटराज'ची चार दशकांची वाटचाल

बारामती : ...बारामतीसारख्या एका छोट्या शहरात सांस्कृतिक चळवळ वृध्दींगत व्हावी व लोकांची सांस्कृतिक भूक भागावी या उद्देशाने वयाच्या अठराव्या वर्षी एक ध्येयवेडा युवक काहीतरी करु पाहतो...41 वर्षांपूर्वी बारामतीत नाट्य चळवऴ जोपासावी या उद्देशाने संस्थेची स्थापना करायचे ठरवतो आणि नटराज नाट्य कला मंडळ या संस्थेचे इवलेसे रोपटे लावतो...पाहता पाहता या संस्थेचा वटवृक्ष होतो आणि बारामतीतही सांस्कृतिक वातावरण तयार होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तब्बल 41 वर्षांपूर्वी 9 ऑक्टोबरला किरण बबनराव गुजर हा अठरा वर्षीय युवक एक संस्था स्थापन करण्याचे मनावर घेतो काय, त्याला त्याचा मित्र परिवार त्यात सक्रीय साथ देतो काय, आणि आज या संस्थेची 40 वर्षे पूर्ण होतात काय...सगळंच एखाद्या चित्रपटात शोभावे असेच.
नाट्य क्षेत्रात कार्यरत बारामतीतील नटराज नाट्य कला मंडळ या संस्थेचा आज 41 वर्धापनदिन.

ग्रामीण रसिकांना नाट्यमेजवानी मिळावी, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा या साठी ही संस्था स्थापन झाली. गेल्या चार दशकांच्या वाटचालीत संस्थेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली मात्र संस्थेची वाटचाल आजही तितक्याच दमदारपणे सुरु आहे. 

आपले वडील (कै.) बबनराव गुजर यांचा नाट्यचळवळीचा वारसा किरण गुजर यांनी पुढे सुरु ठेवला आहे. या कालखंडात नटराजने तब्बल 48 हौशी नाटकांची निर्मिती केली. ग्रामीण भागातील एखाद्या संस्थेने इतक्या मोठ्या संख्येने नाटकांची निर्मिती करणे ही घटनाच वैशिष्टयपूर्ण म्हणावी लागेल. या काळात संस्थेला पाच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. दूरदर्शनसोबत संस्थेने फाट्याच पाणी हा लघुपटही केला. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षी नटराजने पाच दिवस जाणता राजाचे प्रयोग बारामीतकरांसाठी उपलब्ध करुन दिले होते. 

1987 मध्ये नटराजच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेचे आयोजन सुरु झाले, आज सलग 33 वर्षे या एकांकीका स्पर्धेतील सातत्य टिकून आहे. पुरुषोत्तम वगळता अशा सातत्याने चालणा-या एकांकीका तशा विरळाच. अनेक होतकरु कलावंत या एकांकीका स्पर्धेतून सिने व नाट्यसृष्टीला मिळाले. सोनाली कुलकर्णी, योगेश सोमण, हेमंत एदलाबादकर, विक्रम गायकवाड, श्रीधर विसाळ, रंजन देशपांडे या सारखी अनेक नावे घेता येतील. 

नटराजची स्थापना ज्या वर्षी झाली, त्या वर्षापासूनच दरवर्षी स्वातंत्र्यदिनी चित्रकला व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यातील सातत्य गेली चार दशके टिकून आहे. विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धांना दरवर्षी मिळतो. 
सन 2002 पासून नटराजने स्वस्त नाटक योजना सुरु केली. स्वस्तात बारामतीकरांना दर्जेदार नाट्यप्रयोग तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम पाहता यावेत, हाच त्या मागचा उद्देश होता. या योजनेत बारामतीकरांनी रंगभूमीवरील अनेक दिग्गज कलाकारांना बारामतीत याची देहा याची डोळा अभिनय करताना अनुभवले.

नटराजने सलग पाच वर्षे बारामती लावणी महोत्सवही आयोजित केला. लोककलेला प्रोत्साहन व महिलांसाठीही बारामतीत प्रथम लावणी खुली करुन देण्याचे एक वेगळे काम संस्थेने केले. महिलाही लावणीचा आस्वाद घेऊ शकतात यावर कोणाचा विश्वास नव्हता पण बारामतीत नटराजने महिलांना हा कार्यक्रम खुला करुन दिला. 

प्रशिक्षण शिबीरे, फिल्ममेकींग कार्यशाळांच्या आयोजनासह विविध व्यक्ती व संस्थांच्या मदतीसाठी नाट्यप्रयोगांचे आयोजन करुन त्यातून आरोग्य व इतर कारणांसाठी नटराजने दीड कोटींची मदत उभी करुन दिली आहे. 1995 व 2012 मध्ये बारामतीत झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी किरण गुजर व नटराजने स्विकारुन ही संमेलने यशस्वी करुन दाखवली आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नटराज नाट्य कला मंडळ आज 41 वर्षात पदार्पण करीत आहे, याचे मला वैयक्तिक समाधान आहे. या चळवळीने बारामतीकरांची सांस्कृतिक भूक भागविण्यात आम्ही खारीचा वाटा उचलला व बारामतीकरांनीही आम्हाला भरभरुन प्रेम दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही सातत्याने मदतीचा हात पुढे केला. नाटयरसिकांच्या प्रेमामुळे ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा भविष्यात आमचा प्रयत्न आहे. नटराजच्या चार दशकांच्या वाटचालीत नटराजचे सर्व सदस्य, त्यांचे कुटुंबिय व असंख्य बारामतीकर यांनी दिलेले योगदान सर्वात महत्वाचे आहे. -किरण गुजर, अध्यक्ष, नटराज नाट्य कला मंडळ, बारामती

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com