शाळेच्या दुसऱ्याच दिवशी 59 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह; आणखी 148 माध्यमिक शाळा सुरू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 November 2020

मंगळवारी दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शाळांमध्ये 3 हजार 159 विद्यार्थ्यांनी
उपस्थिती लावली आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता 12 हजार 590 झाली आहे.

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी (ता.24) आणखी 148 माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. यामुळे दोन दिवसांत जिल्ह्यातील 366 शाळा सुरू झाल्या आहेत. सुरू झालेल्या सर्व शाळांमध्ये मिळून अवघे 12 हजार 590 विद्यार्थी उपस्थित राहिले आहेत. यावरून शाळा सुरू झाल्या असल्या तरी कोरोनाच्या भीतीने पालक आणि विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. आजअखेरपर्यंत एकूण 59 माध्यमिक शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून (सोमवारी) माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणे
ऑफलाइन सुरू केल्या आहेत. त्यातही इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग
भरविण्यात येत आहेत. मात्र हे वर्ग भरविण्यापूर्वी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे संमतिपत्र घेणे अनिवार्य आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 15 हजार पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे.

पुणे ते जयपूर व्हाया कोल्हापूर; पुणे पोलिस पाषाणकरांपर्यंत कसे पोचले?​

मंगळवारी दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शाळांमध्ये 3 हजार 159 विद्यार्थ्यांनी
उपस्थिती लावली आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता 12 हजार 590 झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी 9 हजार 431 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. गणपत मोरे यांनी मंगळवारी सांगितले.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळून सुमारे दोन हजार माध्यमिक शाळा आहेत. यापैकी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे 750 तर, ग्रामीण भागात 1 हजार 246 शाळा आहेत. या सर्व शाळांवर मिळून 22 हजार 522 शिक्षक कार्यरत आहेत. मात्र सध्या पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद आहेत. ग्रामीण भागातील शाळांवर 15 हजार 840 शिक्षक कार्यरत आहेत.

JEE Exam: कोरोनामुळे परीक्षा रखडणार? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी म्हणतात...​

साडेसात हजार कोरोना चाचण्या
गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातील 7 हजार 521 शिक्षकांची आरटीपीसीआर ही कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये एकूण 59 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. तीन दिवसांपैकी पहिल्या दिवशी 4 हजार 830 शिक्षकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यात बारा जण पॉझिटिव्ह, दुसऱ्या दिवशी 1 हजार 735 चाचण्या घेण्यात आल्या. त्यात 17 जण पॉझिटिव्ह तर, तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 956 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात 30 जण असे एकूण 59 शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले असल्याचे डॉ. गणपत मोरे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another 148 secondary schools started in Pune district on Tuesday