पुणे ते जयपूर व्हाया कोल्हापूर; पुणे पोलिस पाषाणकरांपर्यंत कसे पोचले?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

कपिल पाषाणकर यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पत्र दिले. त्यामध्ये पाषाणकर यांना पैशांसाठी त्रास देणाऱ्या दोन राजकीय व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करुन त्यांच्याकडून पाषाणकर यांचे अपहरण केले असल्याची शक्‍यता व्यक्त केली.

पुणे : जवळपास एक महिन्यापासून बेपत्ता असलेले प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा पुणे पोलिसांनी शोध घेतला आहे. पाषाणकर यांना जयपूरच्या एका हॉटेलमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना पुण्याला आणले जात आहे. ते का निघून गेले? पुण्यातून बेपत्ता झाल्यानंतर ते कुठे गेले? कोणत्या मार्गाने गेले? याची चौकशी केल्यानंतर याबाबत बरीच माहिती पुढे आली आहे.

Positive Story: IIT पासआउट पोरीनं सोडली २२ लाखाची नोकरी अन् करु लागली सेंद्रिय शेती!​

पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रातील 'त्या' संशयास्पद व्यक्ती 
तीन ते चार दिवस उलटूनही तपासात प्रगती न झाल्याने कपिल पाषाणकर यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पत्र दिले. त्यामध्ये पाषाणकर यांना पैशांसाठी त्रास देणाऱ्या दोन राजकीय व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करुन त्यांच्याकडून पाषाणकर यांचे अपहरण केले असल्याची शक्‍यता व्यक्त केली. संबंधित राजकीय व्यक्ती मंत्रालयात ठाण मांडून असल्याची माहितीही पुढे आली. मात्र या घटनेनंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्वतःच या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या खांद्यावर पाषाणकर यांना शोधण्याची जबाबदारी सोपविली. 

गुन्हे शाखेची दोन ते तीन पथके शोधासाठी मार्गस्थ 
बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी तपासाला गती दिली. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचे पथक कोल्हापुरपर्यंत पोचले. तेथील एका हॉटेलमध्ये पाषाणकर थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तेथे तपासणी केल्यानंतर ते पाषाणकरच असल्याची खात्री पटली. त्यानंतर पथकाने गणपतीपुळे, गगनबावडा येथे तपास केला. तेव्हा पाषाणकर हे महाराष्ट्राबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने कर्नाटकमध्येही शोध घेतला. 

व्यावसायिक गौतम पाषाणकर का निघून गेले? वाचा सविस्तर

अखेर 20 नोव्हेंबरला दिसाल आशेचा किरण ! 
युनीट एकच्या पथकाकडून पाषाणकर यांचा शोध घेण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले होते. त्यादृष्टीने तांत्रिक माहितीवर भर देण्यात आला होता. या माहितीच्या आधारे पथखाने विशेषतः पाषाणकर हे संभाव्य कोणकोणाला फोन करु शकतात, कोणाच्या संपर्कात येऊ शकतात, यावर भर देण्यात आला. 20 तारखेला पाषाणकर हे राजस्थानमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस कर्मचारी योगेश जगताप, अय्याज दड्डीकर, बानगुडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. गायकवाड, जगताप आणि दड्डीकर यांचे पथक 23 नोव्हेंबरला विमानाने राजस्थानला रवाना झाले. तेथे त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनेक लॉज, हॉटेल्सची पाहणी केली. त्यावेळी त्यांना 'फोर्ट चंद्रगुप्त' या हॉटेलमध्ये पाषाणकर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांनी हॉटेलची तपासणी केली, तेव्हा त्यांना पाषाणकर सुखरूप दिसले. 

आनंद महिंद्रांनी दिलेली गेम सोडवा अन् फिरायला जा!​

पुणे ते जयपूर व्हाया बंगळुरू, कोलकाता, दिल्ली! 
पाषाणकर यांनी पुण्यातुन कोल्हापुर, तेथून बंगळुरू, मदुराई, हैद्राबाद येथे बसने प्रवास केला. त्यानंतर ते कलकत्ता आणि दिल्ली येथे रेल्वेने पोचले. तर 20 नोव्हेंबर रोजी ते राजस्थानमधील जयपूर शहरातील 'फोर्ट चंद्रगुप्त' हॉटेलमध्ये वास्तव्यास आले. तब्बल एक महिना प्रवास करीत पाषाणकर जयपुरला पोचले. त्यांच्याकडे आता थोडेच पैसे शिल्लक राहीले होते. 

या पथकाने यशस्वीपणे पार पाडली जबाबदारी 
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतर अतिरीक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे आणि पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार, युनीट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या पथकाने पाषाणकर यांचा शोध घेतला. त्यांच्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस कर्मचारी योगेश जगताप, अय्याज दड्डीकर, बानगुडे यांचा समावेश होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How missing businessman Gautam Pashankar traveled from Pune to Jaipur