पुणे- मुंबईकरांनी वाढवले पुरंदरचे टेन्शन, आणखी 26 रुग्णांची वाढ 

corona
corona

वाल्हे (पुणे) : पुरंदर तालुक्यामध्ये दररोजच कोठे ना कोठे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील बरेच जण पुणे किंवा मुंबई येथून मूळ गावी परत आलेले आहेत.  त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोनाची साथ पुणे- मुंबई संपर्कातील व्यक्तींमुळे वाढल्याचे अधोरेखीत झालले आहे.

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात
 
पुरंदर तालुक्यामध्ये आज कोरोनाचे तब्बल 26 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 145 वर पोचला आहे. एकट्या सासवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 102 झाली आहे. आजच्या 26 पैकी 21 व्यक्ती सासवड नगरपालिका क्षेत्रातील असून, एक जण वाल्हे येथील मुकदमवाडी येथील, तर चार जण केतकावळे येथील आहे. तसेच, तालुक्यात आजच्या सुपे येथील व्यक्तीच्या मृत्यूमुळे आतापर्यंत कोरोनाचे पाच बळी झाले आहेत. तालुक्‍यातील 23 गावात कोरोनाचा संसर्ग पोचला आहे. 

वाल्हे- मुकदमवाडी येथे आज आढळलेला कोरोनाबाधित तरुण चौदा दिवसांपूर्वी कुर्ला (मुंबई येथून) आपल्या मूळगावी आला होती. मात्र, आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना त्रास जाणवू लागल्याने सासवड येथील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या वेळी खासगी रुग्णालयामार्फत त्याची खासगी लॅबमध्ये कोरोना विषाणूची तपासणी केली. त्याचा तपासणी अहवाल आज सकारात्मक आला असल्याचे तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई कनेक्शने वाल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्याने वाल्ह्यासह आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच ग्रामपंचायत प्रशासन व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने वाडीमध्ये जाऊन कोरोना नियंत्रण समिती व ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे त्यांच्या घशातील द्राव काढुन प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. 

या तरुणाला कोरोनाचा संसर्ग नेमका कोठे आणि कसा झाला, याचा तपास आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. याबाबत सरपंच अमोल खवले यांनी सांगितले की, मुदकमवाडी येथील रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर गावात सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मुकदमवाडी येथे औषध फवारणी करून निर्जुंतिकीकरण करण्यात येणार आहे. रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने सुरू केले आहे.

वाल्हे गाव व वाड्यावस्त्यांवरील नागरिकांनी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करताना जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी केले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता शासकीय नियम पाळून घरात बसूनच स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केले आहे.

वाल्ह्यात आठवडे बाजार पुन्हा बंद
वाल्हे गावाजवळच्या मुकदमवाडी येथील तरुणाचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर प्रतिबंधात्मिक उपाय म्हणून आज वाल्हे येथे भरलेला आठवडे बाजार ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाच्या सुचनेनंतर बंद करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com