पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

भरत पचंगे
Sunday, 12 July 2020

राज्यातील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींसह पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबतची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होऊन त्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्यातील महाआघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत.

शिक्रापूर (पुणे) : राज्यातील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींसह पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबतची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत होऊन त्याची कार्यवाही करण्याचे आदेश राज्यातील महाआघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील प्रदीप गारटकर, माऊली कटके व आमदार संजय जगताप यांनाही आदेश प्राप्त झाले असून, त्यानुसार निवड प्रक्रियेचे काम तिघांनीही तातडीने हाती घेतले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे जिल्ह्यातील सुमारे ७५० मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तिनही महाआघाडी-सरकार पक्षातील पदाधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून संधी देण्याचे स्पष्ट आदेश तिनही पक्षांना देण्यात आले असून, या बाबत तिनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी सर्व तालुकाध्यक्षांना तालुकानिहाय यादी बनविण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व याद्या जिल्हाध्यक्ष संकलीत करणार असून, त्यावर स्थानिक आमदार-खासदार (महाआघाडीचे) यांच्या शिफारशी जोडून अंतिम याद्या पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द करून जिल्ह्यातील सर्व महाआघाडीचे प्रमुख नेते मिळून हे सर्व ७५० प्रशासक जाहीर करणार आहेत. या बाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके या दोघांनीही या माहितीला दुजोरा दिला. तसेच, पुढील दहा दिवसात अंतिम ७५० प्रशासक नियुक्त्या करण्याचे ठरल्याचेही दोघांनी सांगितले. 

... म्हणून रविवारीच पुणेकरांनी केला आखाड साजरा! 

पुणे जिल्ह्यातील खेड (९१), शिरुर (७३), हवेली (५५), आंबेगाव (३०), बारामती (४९), भोर (७४), दौंड (५०), इंदापूर (६१), जुन्नर (६७), मावळ (५८), मुळशी (४५), पुरंदर (६६), वेल्हे (३१) आदी तालुक्यांतील एकुण १४०७ ग्रामपंचायतींपैकी ७५० ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम चालू महिन्यात होणे अपेक्षित होते. या सर्व ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्रात संबंधित गावांचे नकाशे अंतिम करणे, तलाठी-ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीने प्रभाग निश्चित करणे, सीमा निश्चित करणे, अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण निश्चित करणे व तहसीलदारांकडून या सर्व रचनेला मान्यता घेणे. आदी प्रक्रियाही पूर्ण झालेल्या आहेत. दरम्यान, या नियुक्त्या निकष स्पष्ट नसल्याने या बाबत सरकार काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र, ही बाब राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील म्हणून महाआघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेतला. 

'राजभवनात कोरोना, अमिताभजींना कोरोना' असं म्हणत सामंतांनी UGCला लावला टोला!​

या बाबत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनाही सूचना प्राप्त झाल्याची माहिती त्या दोघांनी दिली. त्याप्रमाणे तिनही जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यातील १३ तालुक्यातील आपापल्या तालुकाध्यक्षांना पक्षनिहाय सरपंचांची यादी बनवायला सांगितली आहे. पुढील दोन दिवसात तालुकानिहाय याद्या बनवून त्यावर पुन्हा तिनही जिल्हाध्यक्ष एकत्र बसून अंतिम ७५० प्रशासक यादी पालकमंत्री अजित पवार यांचेकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. सदर यादीवर पुन्हा राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून सदर यादी फायनल करतील व पुढील दहा दिवसात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार ही यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सुपुर्द करून या यादीप्रमाणे प्रशासक नियुक्तीची प्रशासकीय कार्यवाही होणार असल्याचे गारटकर व कटके यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appoint administrators of 750 gram panchayats in pune district