अभय योजनेत पुण्याच्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांनाही मान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

अभय योजनेतून सातशे ते आठशे कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याचा अंदाज महापालिकेला आहे. 

पुणे : मिळकतकरातील सवलतीची अभय योजना मंजूर करताना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनाही "मान' दिला असून, विरोधकांच्या उपसूचनासह सुमारे 50 लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांसाठी 2 ऑक्‍टोबर ते 30 नोव्हेंम्बर या कालावधीत ही योजना लागू केली. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांना सर्वसाधारण करात 15 टक्के सवलत मिळणार आहे. अभय योजनेतून सातशे ते आठशे कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याचा अंदाज महापालिकेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असतानाच मिळकतकराच्या थकबाकीचा आकडा मात्र साडेपाच-पावणेसहा हजार कोटींच्या घरात गेला आहे. थकबाकी वसुलीसह उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने सत्ताधाऱ्यांनी अभय योजना जाहीर करीत, थकबाकीच्या दंडाच्या (शास्ती) रक्कमेवर 80 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी मांडला होता. मात्र, या प्रस्तावाला कॉंग्रेसने विरोध केला होता. त्यानंतर अभय योजनेच्या मूळ प्रस्तावात बदल करीत, 50 लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय झाला. तसेच, येत्या 30 सप्टेंबर म्हणजे, बुधवारपर्यंत कराची रक्कम भरणाऱ्यांना 15 टक्के सवलत देण्याची उपसूचना मंजूर करण्यात आली. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ""शहराच्या विकासासह कोरोनाच्या उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. हा खर्च भागविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर उत्पन्नवाढीचे प्रयत्न होत आहेत. त्यातून अभय योजना राबविण्यात येणार आहे. ती योजना राबविताना शंभर निवासी आणि व्यावसायिक मिळकतींकडील शंभर टक्के थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. '' 

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

शहरात जागोजागी उभारलेल्या खासगी मोबाईल कंपन्यांकडे सुमारे पावणेतीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, मिळकतकरावर आक्षेप घेत या कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय काही निवासी आणि खासगी मिळकतीच्या थकबाकीची प्रकरणे न्यायालयात आहेत. ती वसूल करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेसाठी नव्या वकिलांची नेमणूक केली जाणार असल्याचेही रासने यांनी सांगितले. 

 

एकूण मिळकती 
9 लाख 10 हजार 
एकूण थकबाकी 
5 हजार 739 कोटी 
थकबाकी असलेल्या मिळकती (सर्व प्रकारच्या) 
5 लाख 34 हजार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Approved Abhay Yojana for income tax relief