महिलांसाठी लष्कर भरती; चुकीची माहिती मिळाल्याने उसळली तोबा गर्दी

टीम ई सकाळ
Tuesday, 12 January 2021

भारतीय सैन्यातील आर्मी पोलिस पदाकरीता महिलांसाठीची भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील तीन दिवसांसाठी वानवडीमधील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल ट्रेनिंगच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

घोरपडी - भारतीय सैन्यातील आर्मी पोलिस पदाकरीता महिलांसाठीची भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील तीन दिवसांसाठी वानवडीमधील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल ट्रेनिंगच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठीची अशाप्रकारची ही पहिलीच भरती सुरू आहे. या भरतीनंतर यापुढे महाराष्ट्रातल्या मुलीसुद्धा आता सैन्यात पराक्रम गाजवतात दिसतील. 

वानवडीत 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. युवा महिलांनाही सैन्यात संधी मिळावी या उद्देशानं ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. महिलांसाठी पहिल्यांदा भरती प्रक्रिया सुरू आहे असे समजल्यावर या परिसरात सोमवारी रात्रीपासून मुली व पालक जमा झाले होते. मंगळवारी पहाटेपासून परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.  

हे वाचा - ती दुबई फिरुन आली अन् बोगस पासपोर्ट देणाऱ्याचं बिंग फुटलं

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारों मुली आल्या होत्या. भरतीसाठी नावनोंदणी केल्यावर ऑडमिट कार्ड असलेल्या महिलांनाच यावेळी प्रवेश दिला गेला. त्यामुळे येथे जमलेल्या हजारो मुलींना परत जावे लागले. खुली भरती प्रक्रिया आहे असा समज झाल्याने हजारों मुलींच्या स्वप्नांवर यामुळे पाणी फिरले आहे.

अजून दोन दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून फक्त अडमिड कार्ड असल्यावरच प्रवेश मिळणार आहे. ही खुली भरती नाही, खुली भरती प्रक्रिया आहे, हा गैरसमज झाल्याने सकाळी हजारों मुली येथे जमा झाल्या होत्या, त्यामुळे गर्दी झाली होती. आर्मीकडून त्याबाबत खुलासा केल्यावर ही गर्दी ओसरली. 
एस पी साळगावकर, पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस ठाणे

हे वाचा - काँक्रिट मशिनचा धक्का लागल्याने पुण्यात तरुणाचा जागीच मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना

भरतीसाठी येऊनही प्रवेश न मिळालेल्या अमरावतीच्या मनिषा पवार यांनी सांगितले की, महिला आर्मी भरतीची जाहिरात मोबाईल पाहिली, त्यामुळे अमरावती वरून इथे आलो, आम्ही नावनोंदणी केली होती, पण काही प्रतिक्रिया न मिळाल्याने आज प्रवेश मिळाला नाही . त्यामुळे आमची खूप निराशा झाली असून आर्मीत जाण्याचे स्वप्न दुभंगले आहे. आम्ही चौघीच इतक्या लांबुन आलो आहोत, निदान आम्हाला भरती प्रक्रिया प्रवेश मिळाला असता तरी बरे वाटले असते. भरतीबाबत आमच्यासारखी अनेक मुलींना योग्य माहिती न मिळाल्याने त्यांना परत जावे लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: army recruitment for womens crowd because wrong information