यंदा पालक, शिक्षकांचीही ‘परीक्षा’

धनंजय बिजले
Thursday, 28 January 2021

कोरोना साथीचा शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. विद्यार्थी जीवनात दहावी-बारावी टर्निंग पॉइंट मानला जातो. मात्र, यंदा शाळाच बंद असल्याने शिकण्यावर कमालीच्या मर्यादा आल्या.

पुण्यासह राज्यातील महाविद्यालये सुरू होण्याचा अजून पत्ता नाही तोवर दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या. यामुळे लाखो विद्यार्थी, पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असेल. कोरोनाच्या साथीमुळे यंदा परीक्षा होणार का, झाल्या तर कधी होणार? याबाबत अनेकांच्या मनात शंका होत्या. त्याला पूर्णविराम देत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांच्या तारखा जाहीर करून सकारात्मक पाऊल टाकले आहे. त्याबद्दल मंडळाचे अभिनंदन करायला हवे. दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अजून प्रथम सत्र परीक्षेचेही नियोजन केलेले नाही. विद्यापीठाने जरूर महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्याला राज्य सरकारनेच खोडा घातला. त्यामुळे राज्यात शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरी महाविद्यालये अजूनही बंदच आहेत. यावरून शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील अनागोंदी कारभार दिसून येतो.  

Farmer Protest : अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर फडकावले खलिस्तानी झेंडे 

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा 
कोरोना साथीचा शिक्षण क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला. विद्यार्थी जीवनात दहावी-बारावी टर्निंग पॉइंट मानला जातो. मात्र, यंदा शाळाच बंद असल्याने शिकण्यावर कमालीच्या मर्यादा आल्या. समाधानाची एकच बाब म्हणजे यावेळी बाजारात पाठ्यपुस्तके वेळेत उपलब्ध होती आणि अनेकांनी ती घेतलीही होती. कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरु केले. शिक्षकांप्रमाणेच सर्व विद्यार्थी, पालकांसाठी हा कसोटीचा काळ होता. ऑनलाइन शिक्षणाचे जसे काही फायदे आहेत, तशाच अनेक मर्यादाही आहेत. मुलांना प्रत्यक्ष शाळेत विषय जितका चांगला समजतो, तितका तो ऑनलाइन समजत नाही. प्रात्यक्षिकांविना विज्ञान शाखेचे शिक्षण अवघडच आहे. अनेकांना आर्थिक तसेच तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन शिक्षण घेणे दुरापास्त झाले. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ६० ते ७० टक्के मुलांना  योग्य प्रकारे ऑनलाइन शिक्षण मिळाले नाही. अशावेळी शिक्षण विकास मंच सारख्या काही संस्थांनी स्तुत्य उपक्रमही राबविले. शंभर दिवसांत दहावीची तयारी कशी करून घेता येईल, याबाबत विषयानुसार शिक्षकांना मार्गदर्शन केले. हजारो शिक्षकांना आणि पर्यायाने लाखो विद्यार्थ्यांचा त्याचा लाभ झाला.

IMF ची भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज', चीनलाही टाकणार मागे

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा अवधी 
कोरोनाचा कहर कमी होताच सरकारने शाळा सुरु करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. २३ नोव्हेंबरला राज्यात शाळा सुरु झाल्या. शाळा सुरु होऊन जवळपास दोन महिने झाले. या काळात कोठेही कोरोना वाढल्याचे किंवा कोणाला त्रास झाल्याचे आढळले नाही. शिक्षक व पालकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय योग्यच होता, हे यावरून स्पष्ट होते. या काळात शाळांतील उपस्थिती जरी १०० टक्के   नसली तरी ती अगदीच वाईट नव्हती. थोडक्यात शाळा सुरु झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले. शेवटी कोरोनाच्या नावाखाली मुलांना मूलभूत शिक्षणापासून किती काळ दूर ठेवायचे, याचा विचार करायला हवा होता. आता परीक्षांच्या तारखा जाहीर करून मंडळाने पुढचे पाऊल टाकले आहे. त्यामुळे लाखो मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती दूर झाली आहे. नेहमीच्या तुलनेत परीक्षा थोड्या उशिराने एप्रिलमध्ये होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही तयारीसाठी पुरेसा अवधी मिळणार आहे. शिवाय, यंदा अभ्यासक्रमही २५ टक्क्यांनी कमी केला आहे. आता या उरलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांकडून परीक्षांची तयारी करून घेण्याचे आव्हान शिक्षक व पालकांसमोर आहे. सामुहिक प्रयत्नांतून हे आव्हान नक्कीच पार पाडले जाईल, यात शंका नाही. त्यामुळे यंदा केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे तर पालक व शिक्षकांचीही खऱ्याअर्थाने ‘परीक्षा़'' आहे. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

विद्यार्थ्यांकडून परीक्षांची तयारी करून घेण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आता शिक्षकांना ठेवावे लागणार आहे. यंदा मुले शिक्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या पातळीवर आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शिक्षकांनी आता प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यावर सर्वाधिक भर द्यायला हवा. प्रश्न सोडविताना न समजलेला भाग त्यांना पुन्हा शिकवायला हवा.
- डॉ. वसंत काळपांडे, माजी शिक्षण संचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about school teacher parents