Video : शहरी जीवनाला निसर्गाशी जोडणारी आर्किटेक्‍ट

नीला शर्मा
रविवार, 31 मे 2020

कल्याणी कुलकर्णी ही आर्किटेक्‍ट तरुणी अर्बन डिझाईन, डिजिटल आर्किटेक्‍चर व प्रॉडक्‍ट डिझाईन अशा नव्या माध्यमातून शहरी नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आणू पाहते आहे. लंडनला मास्टर्स डिग्री घेऊन, तिथल्या एका नामांकित संस्थेत नोकरीची उत्तम संधी मिळत असतानाही ती भारतात परतली. कल्याणी तिची चित्रं टाकाऊ कार्डबोर्ड, उरलेले कागद, काच अशा माध्यमांवर साकारते.

कल्याणी कुलकर्णी ही आर्किटेक्‍ट तरुणी अर्बन डिझाईन, डिजिटल आर्किटेक्‍चर व प्रॉडक्‍ट डिझाईन अशा नव्या माध्यमातून शहरी नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात आणू पाहते आहे. लंडनला मास्टर्स डिग्री घेऊन, तिथल्या एका नामांकित संस्थेत नोकरीची उत्तम संधी मिळत असतानाही ती भारतात परतली. कल्याणी तिची चित्रं टाकाऊ कार्डबोर्ड, उरलेले कागद, काच अशा माध्यमांवर साकारते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

लंडनमध्ये राहण्याचं स्वप्नं अनेक तरुणांना पडत असताना कल्याणीने मात्र तेथील नोकरीची चालून आलेली संधी सहज नाकारली. मात्र, आर्किटेक्‍ट होण्यासाठी तेथील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम आत्मसात केला. एका संस्थेत वर्षभर कार्यानुभव घेतला. हे ज्ञान आपल्या शहरासाठी उपयोगात आणावं म्हणून ती पुण्यात परतली. ती म्हणाली, ‘‘शहरांचा विकास होताना त्यात निसर्गाला महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे. महानगरी जीवन आणि निसर्ग यांच्यात दुवा ठरणारी कामं करता यावीत, हा ध्यास मला जडला आहे. तो माझ्या चित्रांमधूनही डोकावतो. वास्तविक आर्किटेक्‍ट या नात्याने चित्रं काढली जातात, ती समोर दिसलेलं काही नोंदून ठेवण्यासाठी किंवा सुचलेली कल्पना टिपून ठेवण्यासाठी. मात्र कामाच्या प्रक्रियेचा एक भाग असलेल्या रेखाकृती, या पलीकडे जाऊन रम्य कल्पनांनी भारलेली चित्रं मी काढत राहते. कॅनव्हासऐवजी माझी चित्रं पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्डबोर्ड, पुठ्ठा आणि ऑफिसच्या स्टेशनरीतून उरलेले वेगवेगळ्या प्रकारचे कागदांवर असतात. त्या साहित्याच्या अंगभूत पोतामुळे निराळा परिणाम साधला जातो. मी काचांवर कीटकांची चित्रं काढली. भिंतीवर लावल्यानंतर सावलीमुळे ‘थ्री डी’ इफेक्‍टची गंमत साधता आली.’’

कल्याणीने असंही सांगितलं की, ॲल्युमिनिअम फॉइलला आकार देऊन छोटी शिल्पं करून पाहते आहे. माझ्या संकल्पना व आरेखनातून धातुशिल्पं साकारली आहेत. यांपैकी काही वनदेवी टेकडीवर बघायला मिळतील. पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी पुणे वनविभागाच्या समितीत मी आहे. आर्किटेक्‍ट व शहरी आरेखनकार या नात्याने माझ्या संकल्पना व आरेखनातून पंचतंत्रातील कथांवर आधारित ही शिल्पं आहेत. या कामांसाठी मी आणि कौशिक सरदेसाई याने अँथेम ही फर्म आणि स्टुडिओ सुरू केला. आम्ही आयुष्यातही जोडीदार होऊन आता शहराच्या विकासकामांमध्ये निसर्गाला एकरूप करण्याचं स्वप्न पाहत आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nila sharma on kalyani kulkarni