Video : कर्णबधिर मधुराचा आर्किटेक्‍टपर्यंतचा प्रेरक प्रवास 

 सीमंतिनी वझे यांच्यासह मधुरा.
सीमंतिनी वझे यांच्यासह मधुरा.

मधुरा वझे ही जन्मत: कर्णबधिर. ऐकताच आलं नाही तर बोलणं कशी शिकणार? पण आई सीमंतिनी यांनी तिला खाणाखुणांऐवजी चक्क बोलायला शिकवलं. मुळात बुद्धिमान असलेल्या मधुराला भाषाविकासामुळे विविध विषयांचं आकलन सोपं गेलं. स्कॉलरशिप मिळवत ती भरारी घेऊ लागली. परीक्षांमध्ये यशाची कमान चढती राहिली. आर्किटेक्‍टच्या शेवटच्या वर्षाला ती आता आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगण्याचा भरभरून आनंद घेत आणि देत असलेल्या मधुराचा इथवरचा प्रवास सहजपणे झालेला नाही. तिच्या जन्मानंतर काही दिवसांनी  आई, सीमंतिनी यांच्या लक्षात आलं की, आपल्या मुलीला ऐकू येत नाही. तेव्हाच्या मनस्थितीबद्दल त्या म्हणाल्या, ‘निराश होणं स्वाभाविकच होतं, पण आहे त्यातून कसा मार्ग काढता येईल, याचा विचार करून तयारीला लागले. मधुराला खाणाखुणांऐवजी तुम्ही - आम्ही बोलतो तशी भाषा शिकवायचं ठरवलं. एका एका शब्दाऐवजी पूर्ण वाक्‍य बोलायची सवय ठेवली. बुद्धीच्या विकासासाठी भाषा हे महत्त्वाचं साधन किंवा माध्यम आहे. सुरवातीला खूप अवघड गेलं, तरी तिला तोंडाच्या हालचालींवरून उच्चार नीट कळू लागल्यावर ती समोरच्याचं बोलणं नीट समजून घेऊ लागली.’

मधुराने सांगितलं की, कर्णबधिरांसाठी असणाऱ्या विशेष शाळांऐवजी मी ऐकता- बोलता येणाऱ्यांच्या शाळेत शिकले. त्यामुळे त्यांच्यासोबत मी सगळं छान शिकत राहिले. निबंध स्पर्धांमध्ये मला बक्षिसं मिळायची. राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील यशाने मला स्कॉलरशिप मिळवून दिली, ती घटना माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. मी राज्यस्तरीय अनेक निबंधस्पर्धांबरोबरच विज्ञानविषयक स्पर्धांमध्येही आत्मविश्वासाने भाग घेत यश मिळवत राहिले. आर्किटेक्‍ट व्हायचं, हे माझं ठरून गेलं होतं. शालेय परीक्षांमध्ये खूप छान गुण मिळवून मी आर्किटेक्‍टकडे वळले. हे शेवटचं वर्ष आहे. हा अभ्यास मला फार आवडला. 

सीमंतिनी म्हणाल्या, ‘इतर कर्णबधिर मुलांना भाषा व इतर उपयुक्त शिक्षण द्यायचं मी ठरवलं. आतापर्यंत तीस मुलं माझ्याकडे शिकली आहेत. विशेषतः त्यांच्या पालकांचं मनोधैर्य वाढवणं, आपल्या कर्णबधिर मुलाशी कसं बोलायचं, यासाठी समुपदेशन करते. मधुराने मला तिच्या या प्रवासात सामील करून घेतलं आणि त्यामुळे तिच्यासह इतर मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर वेळोवेळी मला सृजनाचा आनंद बघायला मिळाला, याचं विलक्षण समाधान वाटतं. अलीकडेच मधुराने बर्कले विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय निबंधस्पर्धेत यश मिळवलं, ही तर आपल्या देशासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com