बेरोजगार आहात? काळजी करू नका; ट्रेनिंगदरम्यान मिळणार दरमहा १० हजार अन् त्यानंतर नोकरीही!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

या बाबत अधिक तपशील हवा असल्यास संबंधित युवकांनी मयांक 8390902500 किंवा भावेश 9767645589 यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन क्रेडाईने केले आहे.​

पुणे : चौथीपर्यंतच शिक्षण झाले आहे.... नोकरी पाहिजे.... काळजी करू नका, उचला फोन आणि फिरवा नंबर.... दोन महिने प्रशिक्षणही मिळेल आणि मुख्य म्हणजे राहण्याची आणि जेवणाचीही सुविधा चक्क मोफत उपलब्ध होणार आहे. अन त्या काळात स्टायपेंड म्हणून दरमहा 10 हजार रुपये मिळणार आहेत... वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही युवकांना 'क्रेडाई पुणे मेट्रो'कडून ही संधी उपलब्ध झाली आहे. 

कोरोनाच्या आपत्तीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींचे रोजगार बसले आहेत. या काळातच परप्रांतीय कुशल मजूर आपआपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरीची संधी चालून आली आहे. अट इतकीच आहे की, किमान चौथीपर्यंत शिक्षण झाले पाहिजे अन वयाची 18 वर्षे.

ग्राहकांना त्रास कशाला? महावितरणला झालेले नुकसान 'असे' भरुन काढा!​

बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेच्या पुणे मेट्रो कार्यालयाने यासाठी कुशल या उपक्रमातंर्गत पुढाकार घेतला आहे. इच्छूक युवकांना बारबेंडिंग टेक्निशिअन आणि शटरिंगचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण पुण्यात दिले जाणार आहे. बाहेरगावच्या युवकांची राहण्याची, चहा- नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण क्रेडाई पुरविणार आहे. तसेच प्रशिक्षण काळात त्यांना दरमहा 10 हजार रुपये स्टायपेंडही दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना दरमहा किमान 12 ते 15 हजार रुपये पगारीची नोकरीही क्रेडाई मिळवून देणार आहे. एक वर्षांनंतर युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार दरमहा 15 ते 18 हजार रुपये पगार मिळू शकतो, अशी माहिती क्रेडाईतर्फे देण्यात आली. 

तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!​

प्लंबिंग किंवा इलेट्रिकचा डिप्लोमा झालेल्या युवकांनाही अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याची ही संधी या उपक्रमात मिळणार आहे. क्रेडाईने या पूर्वी गवंडीकाम, टाईलिंग, प्लंबिंग, पेंटिंग, सुतार आदींचे युवकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यातून हे युवक स्वतःच्या पायावर सक्षमतेने उभे आहेत, असे क्रेडाईकडून सांगण्यात आले. कुशल आणि अकुशल या दोन्ही प्रकारांत युवकांना रोजगाराची संधी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाउनच्या काळात बांधकाम क्षेत्र बंद होते. परंतु, आता बांधकामे सुरू झाली आहेत. परंतु, कामगारांची टंचाई भासत असल्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या बाबत अधिक तपशील हवा असल्यास संबंधित युवकांनी मयांक 8390902500 किंवा भावेश 9767645589 यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन क्रेडाईने केले आहे. 

शिक्षक भरती : राज्यात होणार 'घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन'​

कायम रोजगाराची चांगली संधी
या बाबत क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे प्रमुख जे. पी. श्रॉफ म्हणाले, बांधकाम क्षेत्र विस्तारत असल्यामुळे येथे रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. प्रशिक्षण काळात स्टायपेंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असल्यामुळे युवकांना सोयीचे होऊ शकते. प्रशिक्षणानंतर चांगला प्रकारचा रोजगार मिळत असल्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोणत्याही जिल्ह्यातील युवकांना संधी 
जिल्हाबंदी सध्या असली तरी नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी कोणत्याही जिल्ह्यांतून 20 युवकांचा गट झाल्यास त्यांना पुण्यात आणण्याची व्यवस्था क्रेडाई करणार आहे. त्यासाठी शासकीय परवानगी घेणे, बस उपलब्ध करणे या जबाबदारी क्रेडाईच घेणार आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतील युवकांनाही पुण्यात येऊन चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेऊन प्राप्ती करणे शक्य होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Credai Pune Metro has been available job opportunity to youth who completed 18 years of age