Video : कासवांना जगवण्याचा ध्यास घेतलेली नुपूर

कासव संवर्धनासाठी अभ्यास प्रकल्पांमध्ये रमणारी नुपूर काळे, हातावरील छोट्या कासवाशी गप्पा मारताना.
कासव संवर्धनासाठी अभ्यास प्रकल्पांमध्ये रमणारी नुपूर काळे, हातावरील छोट्या कासवाशी गप्पा मारताना.

लहानपणी सर्व प्रकारच्या खाद्यांवर ताव मारणारी ‘ती’ कासवं मोठी झाल्यावर मात्र ठराविक दोनच प्रकारच्या खाद्यांवर जगतात, हे आश्‍चर्य वाटावं असचं आहे ना! अशाच काही गंमत गोष्टी नुपूर काळे या तरुणीने जागतिक कासव दिनानिमित्त (२३ मे) सांगितल्या आहेत. कासवांच्या संवर्धनविषयक प्रकल्पांमध्ये भाग घेऊन तिने ओरिसा, श्रीलंका, लक्षद्वीप व कॉस्टारिका आदी ठिकाणच्या समुद्रांत व सागर किनाऱ्यांवर भरपूर मुशाफिरी केली आहे.

नुपूर काळे कासवांच्या अधिवासात वरचेवर जात असते. गेल्या सहा वर्षांपासून ती कासवांच्या संवर्धनविषयक काही अभ्यासप्रकल्पांमध्ये सहभागी झालेली आहे. कासवांचं जग जवळून न्याहाळण्यासाठी ती कधी समुद्रात सूर मारून फिरून येते, तर कधी कासवं किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांचं चलनवलन बघत हिंडते. नुपूर म्हणाली, ‘‘आठ वर्षांपूवी मी
जीवशास्त्रातील पदव्युत्तर पदवीनंतर श्रीलंकेला गेले, तेव्हा हिरव्या कासवांशी नातं जुळलं. तिथे कासव संवर्धन चालतं, पण त्या जागांचा उपयोग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी होत असल्याचं दिसून आलं. नंतर ओरिसात ऋषिकुला या किनाऱ्यावर अभ्यासासाठी गेले. तिथे नदीमुखापाशी हजारोंनी कासवं घरटी करायला येतात. दोन वर्षांच्या तिथल्या मुक्कामानंतर आपल्या कोंकणातील वेळास या गावी चालणाऱ्या कासव संवर्धन प्रकल्पातलं काम समजून घेतलं. तिथे पर्यावरणीय पर्यटनातून गावकऱ्यांचा फायदा तर होईल, पण कासव संवर्धनाला धक्का लागणार नाही, याची उत्कृष्ट सांगड घातलेली आहे.’

नुपूरने असंही सांगितलं की, यानंतर कॉस्टारिकातील तॉर्तुगेरोमधल्या वास्तव्यात मी शंभरहून अधिक हिरव्या कासवांना टॅगिंग केलं. (जागतिक स्तरावरील अभ्यासाअंतर्गत ओळख पटविण्यासाठी त्या- त्या सजीवाच्या एखाद्या अवयवाला विशिष्ट फीत बांधली किंवा अडकवली जाते, त्याला टॅगिंग असं म्हणतात.) सी टर्टल कॉन्झर्व्हन्सी अशी जगातील सर्वात जुनी स्वयंसेवी संस्था तेथे मोठया प्रमाणावर कार्यरत आहे. या अनुभवानंतर मी या विषयातील भारतातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. कार्तिक शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षद्विपमध्ये काम केलं. भारतीय भूमीपासून अरबी समुद्रात दोनशे किलोमीटरवर ही बेटं आहेत. इथे ग्रीन, हॉक्‍चबिल व ऑलिव्ह या तीन प्रकारांतील कासवं प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांपैकी पहिल्या म्हणजे हिरवा कासवांची गंमत म्हणजे, लहानपणी सर्वभक्षी असणारी ही मंडळी मोठी झाल्यावर बाकी सगळं सोडून फक्त दोनच प्रकारचं खाणं खाऊ लागतात. लक्षद्विपमध्ये ही आढळण्याचं कारण असं की, त्यांना हवंहवंसं सागरी गवत आणि शेवाळ इथं मुबलक आहे.

वन्यजीव जीवशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय आहे. मात्र यात केवळ पाच - सात वर्षे काम करून फारसं हाती लागत नाही. या विषयाचं नीटसं भान यायला याहून जास्त काळ घालवायला हवा, हे माझ्या पुरतं लक्षात आलं आहे आणि मी या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com