बुद्धिबळातील आचार्य...

Ravindra-Mirashi
Ravindra-Mirashi

बुद्धिबळातील एक उत्तम प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे जोसेफ अँथोनी डिसूझा यांचे नुकतेच निधन झाले. आजवर त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनातून असंख्य उत्तम बुद्धिबळपटू घडले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे बुद्धिबळ विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जोसेफ सरांचा जन्म सन१९६२ मध्ये झाला. त्यांनी ९० च्या दशकात पूर्णवेळ बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला.  तत्कालीन बुद्धिबळाची लोकप्रियता पाहता हा त्यांचा निर्णय खूपच धाडसाचा होता. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे चालते- बोलते बुद्धिबळ विद्यापीठच होते.

जगातील अनेक बलाढ्य बुद्धिबळपटूंचे असंख्य रंजक किस्से, त्यांच्या डावांचा खोलवर अभ्यास, त्यांची खेळण्याची शैली आणि जीवन चरित्रांचा अभ्यास जोसेफ सरांना मुखोद्गत होता. यामागे अफाट वाचन आणि त्याचे उचित आकलन हे सरांचे शक्तीस्थान होते. 

अगदी चिमुकल्या खेळाडूंना बुद्धिबळा सारख्या क्‍लिष्ट खेळाकडे आकर्षित करून, त्यात त्यांची गोडी निर्माण करण्याचे सरांचे कौशल्य वाखाणण्या सारखे होते. चार वेळेस मध्य महाराष्ट्र बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारे जोसेफ सर एकमेव खेळाडू, तर पुणे औद्योगिक बुद्धिबळ स्पर्धा सलग तीनदा जिंकणारे पहिले खेळाडू. 

बुद्धिबळ संघटना पातळीवर सुद्धा विविध पदावर कार्य करताना त्यांनी स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली. नियमांचा अतिरेक करण्या ऐवजी, खेळाडूंसाठी नेहमी लवचिक पण न्याय धोरण अवलंबले. मुळात सर्वांच्या सूचना ऐकून, उचित सूचना स्वीकारून सर्वांना बरोबर घेऊन नेतृत्व करण्याची अनोखी हातोटी जोसेफ सरांच्या कडे होती. सन १९८४ पासून तिनशेच्या वर बुद्धिबळ स्पर्धेत सरांनी प्रमुख पंच किंवा स्पर्धा संचालक म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली. तर सुमारे २५० बुद्धिबळ स्पर्धेचे त्यांनी आयोजन देखील केले. 

सन २००४ मध्ये भारतात प्रथमच झालेल्या सुपर ग्रॅंडमास्टर ( कॅटेगरी -१६ ) बुद्धिबळ स्पर्धेतील आयोजनात त्यांनी मोठे योगदान दिले होते. हे जोसेफ सरांचे कार्य खूपच लक्षवेधी आहे. त्यांच्या असंख्य शिष्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि बुद्धिबळ चाहत्यांनी जोसेफ डिसूझा सरांना आदराने ’बुद्धिबळातील आचार्य’ मानले. या पुरस्काराची उंची मोजता येणार नाही. याच बरोबर शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक, एम.आय.टी. क्रीडा आचार्य, महेश्वरानंद सरस्वती, रोटरी, रोचेस, चेस आयडॉल ऑफ महाराष्ट्र अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचे जोसेफ सर मानकरी झाले.

चेहऱ्यावर कायमस्वरूपी स्मितहास्य तसेच सर्वांशी सभ्य आणि संयमित भाषेतील मधुर संवाद ही जोसेफ सरांची खासियत होती. यातून निर्माण झालेल्या अफाट लोकसंग्रहातील प्रत्येक व्यक्ती बरोबर त्यांचा चांगला ऋणानुबंध निर्माण झाला होता. नीटनेटकेपणा आणि मार्शल आर्ट्‌स मधील काही प्रकारात त्यांना असलेली आवड यामुळे उत्तम शारीरिक तंदुरुस्ती अशा विविध पैलूं मुळे ते एक उत्तम बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून लोकप्रिय ठरले. अशा प्रसन्न आणि लोभस व्यक्तिमत्वाच्या आकस्मित निधनाने बुद्धिबळ क्षेत्रात पोकळी निर्माण होणे साहजिकच आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com