यापुढचे जगणे कोरोना सोबत!

वडगाव बुद्रूक - कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर लावलेले फलक.
वडगाव बुद्रूक - कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर लावलेले फलक.

लॉकडाऊन पूर्णपणे कधी उठणार या प्रश्‍नाला आजतरी कोणाकडे सकारात्मक उत्तर नाही. अशावेळी कोरोनाला सोबत घेऊन, त्याला प्रतिबंधात्मक उपायांनी स्वतःपासून, कुटुंबापासून दूर ठेवतच आपल्याला पुढील प्रवास करावा लागणार हे नक्की. पुण्यात एका बाजूला शहराची चक्रे फिरू लागली असताना दुसरीकडे प्रतिबंधात्मक क्षेत्रात रुग्णसंख्या वाढतच आहे. अशावेळी गरजांवर मर्यादा आणणारी आणि निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाणारी जीवनशैली अंगीकारावी लागेल.

रेड झोन वगळता इतर भागातील लॉकडाउन शिथिल करून आता आठवडा पूर्ण होईल. मात्र रेड, ऑरेंज आणि ग्रीन हे तीनही झोन पूर्णपणे एकमेकांवर अवलंबून असल्याने ना लॉकडाउन शिथिल करण्याचे फायदे नागरिकांना घेता आले, ना रेडझोनमध्ये लॉकडाउनचे नियम पाळले गेले. गेल्या दोन दिवसात पुण्यातील संक्रमित क्षेत्र असलेल्या 69 ठिकाणांमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सरासरी 80 ते 90 ने वाढत आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे, अजूनही हॉटस्पॉट असलेल्या भागात परिस्थिती गंभीर आहे. दुर्दैवाने हा झोपडपट्ट्यांचा भाग असून, येथे नियंत्रण मिळवणे प्रशासकीय यंत्रणांनाही कठीण जात आहे. अशा परिस्थितीत लॉकडाउन शिथिल करून आपण काय, मिळवले असा प्रश्‍नही विचारला जाऊ लागला आहे. याचे उत्तर कोरोनाला सोबत घेऊन त्याच्याशी लढा देतच आपल्याला दैनंदिन चक्र सुरू ठेवावे लागणार हेच आहे. पुण्यात 17 मे नंतर लॉकडाउन उठणार काय? या प्रश्‍नाचे उत्तर आजतरी नाही असेच आहे. मग सध्याच्या परिस्थितीत कसा मार्ग काढणार यावर आता प्रत्येकाला विचार विनिमय करावा लागणार आहे.

पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या दोन हजाराच्यावर गेली आहे. ससून, नायडूसह खासगी रुग्णालयांमध्येही क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत उपचार घेऊन 587 हून अधिक रुग्ण घरी गेले आहेत. "हायरिस्क''मधील म्हणजेच मधुमेह, उच्चरक्तदाब किंवा आधीच्या आजारांमुळे ज्यांची प्रतिकार क्षमता कमी झाली होती, अशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावे लागतील हेच खरे. लॉकडाउन यापुढेही सुरू ठेवणे कोणालाच परवडणार नाही. हातावरचे पोट असणारे असो की अगदी हिंजवडीतील आयटी इंजिनिअर, आज प्रत्येकाची स्थिती सारखी झाली आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत, काहींनी मागच्या महिन्यापासूनच पगाराला भलीमोठी कात्री लावली आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय, सेवा आदीचे चक्र पूर्ववत करावेच लागेल. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. अर्थात हे करण्यासाठी ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी घरी राहून आणि ज्यांना बाहेर पडल्याशिवाय शक्‍य नाही अशांना बाहेर पडून काम करावे लागेल. हे करताना आपल्याला काही नियम कठोरपणे पाळावे लागतील. अर्थात हे नियम जास्त करून जीवनशैलीशी संबंधितच असतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आरोग्य विभागाने सांगितल्याप्रमाणे दहा वर्षाच्या खालील मुले आणि साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी शक्‍यतो बाहेर पडताच कामा नये. मग ते कोणत्याही झोनमध्ये राहणारे असोत. जे लोक बाहेर पडतील, त्यांनी शंभर टक्के मास्कचा वापर करायला हवा. वेळोवेळी हात धुणे, शारीरिक अंतराचे पालन, सार्वजनिक स्वच्छतेचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळणे, म्हणजे रस्त्यात कोण थुंकत असेल तर त्याला पकडून त्याच्या कपड्यांनीच रस्ता स्वच्छ करायला लावण्यापर्यंतचा पुढाकार एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाला घ्यावा लागेल.

सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर सर्वाधिक भर द्यावा लागेल. सॅनिटायझेशनचे सर्व नियम पाळणे, म्हणजे घरी येताना, सोसायटीत प्रवेश करताना स्वच्छतेचे कडक नियम पाळावे लागतील. एक लक्षात घ्यायला हवे कोरोना आपल्या सभोवताली आहेच, त्याला फक्त आपल्या जवळ येऊ द्यायचे नाही. कारण आपल्याला घरी बसणे परवडणारे नाही. त्यामुळे कोरोना जाईल तेव्हा जाईल आपल्याला आपल्या विहाराच्या, खाण्यापिण्याच्या आणि आरोग्य जपण्यासाठीच्या सवयी बदलाव्या लागतील.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवश्‍यक असणारे सर्व नियम, शिस्त काटेकोरपणे पाळावी लागेल. त्यासाठी अपापसांतील संवाद, एकमेकांना प्रशिक्षित करण्याची प्रक्रियाही वाढवावी लागेल. पुण्याने नेहमीच सकारात्मक बदलाला पाठिंबा दिला आहे, आता नव्या जगण्याच्या या बदलांनाही ते साथ देतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com