मुखपट्टीचा सौदा अन्‌ मुखपट्टा!

Panchnama
Panchnama

‘या साडीवरील मॅचिंग मास्क दाखवा बघू. हं...या पॅटर्नमध्ये चार-पाच कलर दाखवा बरं. तो नको. तसला मास्क आमच्या नंदेकडे आहे. तिला तो नगरसेवकाने घेतलेल्या शिबिरात फुकट मिळालाय. नकटी आणि फुकटी मेली! मीही तसला घातल्यावर लोकांना वाटेल, की मीही फुकटचेच मास्क घालते काय?’’ रस्त्यावर मास्क विकणाऱ्या एका विक्रेत्याकडे सुमनताई मास्क पाहात होत्या. एखादा मास्क आवडला की लगेच तोंडाला लावून, तो आरशात बघून, तोंड वेडेवाकडे करून, आपल्याला तो शोभतोय की नाही, याची खातरजमा करीत होत्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशा पंधरा-वीस मास्कची ट्रायल घेतल्यानंतर विक्रेता चांगलाच वैतागला. ‘मॅडम, मास्क तोंडाला लावून पाहू नका.’ असे सांगून तो कंटाळून गेला होता.
‘तुझा काय सोन्याचा मास्क आहे का? असले शंभर मास्क घेऊन मी ते महिला मंडळात वाण म्हणून वाटेल.’’ असे म्हणून त्या त्याला गप्प करीत होत्या.
‘तुम्हारे पास पैठणी का मास्क नही क्‍या? भरजरी शालू से बनाया मास्क तरी दिखाव. रेशमी कपडोंसे बनाया मास्क बी चलेगा. 

पैसोंकी चिंता नही करने का? मास्क बघून सगळ्या शेजारणी जळून खाक झाल्या पाहिजेत.’’ मराठी- हिंदीची सरमिसळ करीत सुमनताईंची गाडी सुसाट सुटली होती.  

‘मला सतत काही ना काही खाण्याची सवय आहे. त्यामुळे ओठाजवळ उघडणारा चांगल्या क्वालिटीचा मास्क दाखवा.’’ त्यांच्या मागणीचा आणखी एक चेंडू विक्रेत्यावर आदळला.
‘मॅडम, असले मास्क नाहीत.’
‘अरे, मास्कमुळे सौंदर्य वाढले पाहिजे. पोलिसांनी दंड आकारायला नको. मास्क न काढता खाण्या-पिण्याची सोय झाली पाहिजे. चेहऱ्यावरील मुरूमं-फुटकळ्या लपल्या पाहिजेत आणि जमलंच तर कोरोनापासून बचाव झाला पाहिजे, असा बहुपयोगी मास्क ठेवत जा.’
‘हो. मॅडम, उद्यापासून ठेवत जाईन. वाटल्यास मास्कला एक छोटासा पंखाही लावेन.’
‘बरं, या मास्कची किंमत काय?’’ सुमनताईंनी विचारले.
‘प्रत्येकी चाळीस रुपये.’

‘बाप रे ! एवढा महाग? त्या कोपऱ्यावरचा तर वीस रुपयांना एक विकतो. साठ रुपयांत चार दे. आमच्या सोसायटीतील सगळ्या बायकांना तुझ्याकडे खरेदीला आणते.’’ सुमनताईंनी त्याला लालूच दाखवली. मघाचं ‘पैसोंकी चिंता नही करने का?’ हे वाक्‍य त्या विसरल्या. 
‘नाही मॅडम, परवडत नाही.’
‘परवडता है ! बहोत परवडता है ! यह लो सिक्‍सटीन रूपये और चार मास्क मुकाट्याने दे दो.’’ साठ रुपयांचे सिक्‍सटीन असे इंग्रजी भाषांतर करीत सुमनताई हिंदीतून बरसल्या. 

भावाची घासाघीस करण्यासाठी त्यांना नेहमीच हिंदी जवळची वाटायची. 
‘मॅडम, तुम्ही तोंडावर लावलेले मास्क धुवायचे म्हटले तरी शंभर रुपये पुरायचे नाहीत. दीडशे रुपये तरी द्या.’
‘अरे बाबा! जुने कपडे फाडकर तुमने मास्क बनाया है! तुम्हारा कितना खर्चा वाचा है, यह हम जानते है. अगर मै घरपर मास्क करनी लगी ना तर तुम्हे पळता भुई थोडी होगी. क्‍या समजे! ’
बराच वेळ घासाघीस झाल्यानंतर सत्तर रुपयांवर सौदा मिटला. मग काय सुमनताईंनी त्या प्रत्येक मास्कबरोबर सेल्फी काढत, फेसबुकवर ती पोस्ट केली व कॅप्शन लिहिली, ‘फिनिक्‍स मॉलमध्ये ब्रॅंडेड मास्कची खरेदी’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com