'आर्थिक निकषांवर जर मराठ्यांना आरक्षण मिळाले, तर मुस्लिमांना का नाही?' : ओवेसी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

आज आदित्य लढत असले, तर उद्या उद्धव ठाकरे 'एमआयए' लढतील, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला. ​

पुणे : "देशात आर्थिक निकषांवर आरक्षण दिले जाते, मराठ्यांनीही आरक्षण दिले जाते. मुस्लिम समाजही मागासलेला आहे, पण त्यांना आरक्षण नाही. हा कुठला न्याय?'' असा सवाल एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारला केला. 

काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी एमआयएमच भरून काढू शकतो, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

एमएसआयच्या पुणे कॅन्टोन्मेंटमधील उमेदवार हीना मोमीन, वडगावशेरी येथील डॅनियन लांडगे आणि हडपसर येथील जाहीर शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ओवेसी यांनी हा सवाल केला. "काँग्रेसची परिस्थिती वाईट झाली आहे. जगातील सर्वांत मोठे कॅल्शिअमचे इंजेक्शन दिले, तरी हा पक्ष आता उठू शकत नाही. पक्षाला नेता राहिला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाचा कॅप्टनच पळून गेला आहे. जे आहेत, ते लढाईला तयार नाहीत,'' अशा शब्दात काँग्रेसची खिल्ली यावेळी ओवेसी यांनी उडविली.

काँग्रेससह भाजप शिवसेनेवर टीका करताना ते 'फॅसिझम'चे राज्य आणू पाहत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी खासदार इम्तियाज जलील, पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिल मुजावर, शफिउद्दीन काझी, नगरसेविका सोनाली लांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत कांबळे यांनी पक्षात प्रवेश केला.

ओवेसी यांचे आगमन होताच 'आया रे आया शेर आया' अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी मैदान दणाणून सोडले. तर पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता, 'चोर है' अशा घोषणा दिल्या. 
मुस्लिम समाजात पन्नासहून अधिक मागास जाती आहेत. मुस्लिम समाज मराठा समाजापेक्षा अधिक गरीब आहे. आतापर्यंत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण मुस्लिम समाजाचे केवळ ए. आर. अंतुले हे एकच मुख्यमंत्री झाले आहेत. तरी देखील या समाजाला आरक्षण का नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

गेल्या सत्तर वर्षात दलित समाजातील नेतृत्व जाणीवपूर्वक उभे राहून दिले गेले नाही, असे सांगून ओवेसी म्हणाले, "भाजप सत्तेवर आल्यापासून मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे. 'मॉब लिचिंग' सारख्या घटना वाढल्या आहेत. मारणाऱ्यांना शिक्षा करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांकडून त्यांना संरक्षण दिले जात आहे. मी त्या विरोधात बोललो, तर भडकविणारे भाषण करतो, अशी टीका करता. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे, त्यांनी चर्चेला यावे. जातीयवादी म्हणून टीका केली जाते, पण मी जातीयवादी नाही.''

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांची अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री

- Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये मंगळवारी 'राज वादळ'

- Vidhan Sabha 2019 : राज्यातील 4 हजार 743 उमेदवारांचे अर्ज वैध


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi raised a question about Muslim Reservation