पवारसाहेबांकडून तमाशा कलावंतांना मोठे आश्वासन

रमेश वत्रे
Saturday, 8 August 2020

राज्यातील अनेक व्यवसाय व उद्योग सरकारने काही नियमांवर सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. तमाशा कलावंताबाबतही सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

केडगाव (पुणे) : तमाशा कलावंतांच्या प्रश्नांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार लक्ष घालणार आहेत. राज्यातील लोकनाट्य कलाकेंद्र सुरू करण्यासाठी सरकारशी चर्चा करून काही नियम व अटींवर परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्याची माहिती राज्य थिएटर मालक संघाचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली.

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर
   
लॉकडाउनमध्ये कलावंतांच्या अडचणी, उपासमार झाली. या पार्श्वभूमीवर पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेलफेअर फंडातून कलावंताना आर्थिक मदत केली. त्याबद्दल पवार यांचे आभार मानण्यासाठी व कलावतांचे प्रश्न मांडण्यासाठी डॉ. अशोक जाधव, अभयकुमार तेरदाळे (मुसळे), जयश्री जाधव यांनी शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत पवार यांनी वरील आश्वासन दिले. 

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

या वेळी जाधव यांनी पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील अनेक व्यवसाय व उद्योग सरकारने काही नियमांवर सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. तमाशा कलावंताबाबतही सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. तमाशा कलावंतही सरकारच्या नियम व अटींचे पालन करतील. राज्यात सुमारे 70 लोककला केंद्र असून, त्यामध्ये वादक, सोंगाडे, सोंगाड्या यांच्यासह 14 हजार कलावंतांची सध्या उपासमार चालू आहे. लॉकडाउनमध्ये कलाकारांना मजुरी काम करण्याची वेळ आली आहे. काही कलाकारांना मजुरी काम सुद्धा मिळत नाही. सरकारने तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. कलाकारांसाठी आर्थिक मदत व पॅकेज जाहीर करावे. लॉकडाउन उठल्यानंतर सरकारने लावणी महोत्सव भरवावे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assurance to Tamasha artists from Sharad Pawar