उसाच्या थकीत एफआरपीच्या पैशांसाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

राजकुमार थोरात
Friday, 9 October 2020

प्रतिटन ४०० रुपये थकीत रक्कम देण्याची मागणी...आठ दिवसांमध्ये पैसे जमा न केल्यास संचालक मंडळाला रस्त्यावर फिरु न देण्याचा इशारा.

वालचंदनगर : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यामध्ये आज शुक्रवार (ता. ९) रोजी बाॅयलर प्रदीपनाचा समारंभ सुरु असताना पिंपळी (ता. बारामती) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष विकास धनाजी बाबर यांनी अंगावरती डिझेल ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छत्रपतीच्या ६५ व्या बॉयलर प्रदीपनाच्या समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम सुरु असताना शेतकरी संघटनेचे विकास बाबर यांनी अचानक आमच्या पैशाचं काही झाल चेअरमन साहेब...आमचे पैसे द्या...पैसे... अशी मागणी करीत अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, प्रसंगवधान राखून ओळखून पुजेसाठी बसलेल्या छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पत्नी व सोलापूरच्या पोलिस उपायुक्त वैशाली पाटील यांनी तातडीने बाबर याच्या हातामधील डिझेल कॅन काढून घेतले.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने बाबर यांना बाजूला घेवून गेले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गतवर्षीच्या गळीत हंगामामध्ये सव्वाचार लाख मेट्रीक टनाचे गाळप केले आहे. उसाची एफआरपीची रक्कम २४७२ रुपये असून, यातील पहिला हप्ता २१०० रुपयांचा रोख दिला आहे. कारखान्याकडून उसाची प्रतिटन ३७२ रुपये एफआरपी रक्कम देणे प्रलंबित आहे.

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

दसरा दिवाळीचा सण जवळ येत असून, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम व दुसरा हप्ता मिळाला नसल्यामुळे सभासदामध्ये नाराजीचा सुर आहे. यासंदर्भात बाबर यांनी सांगितले की, छत्रपती कारखान्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संचालक मंडळाच्या निष्क्रियेतेमुळे एफआरपीची रक्कम न देता कारखान्याचा बॉयलर पेटवला गेला आहे. आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ४०० रुपये प्रतिटनाप्रमाणे पैसे जमा न केल्यास  कारखान्याच्या अध्यक्ष व संचालक मंडळाला फिरुन न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे बाबर यांनी दिला आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted self-immolation demanding FRP amount