"आम्ही कोथरूडकर'ला रसिकांची दाद; संक्रांतीच्या संध्येला संस्कृतीचा गोडवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

यमनचा गोडवा, पुरिया धनाश्रीचा बहार अशा गीत-संगीत-नृत्याच्या सुंदर आविष्काराने "आम्ही कोथरूडकर' अर्थात कोथरूड आमदार सांस्कृतिक महोत्सवाने पुणेकरांना मकर संक्रांतीचा आनंद दिला.

पुणे : यमनचा गोडवा, पुरिया धनाश्रीचा बहार अशा गीत-संगीत-नृत्याच्या सुंदर आविष्काराने "आम्ही कोथरूडकर' अर्थात कोथरूड आमदार सांस्कृतिक महोत्सवाने पुणेकरांना मकर संक्रांतीचा आनंद दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोथरूडचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सचिव राजेश पांडे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूडमधील एमआयटीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमास रसिकांनी भरभरून दाद दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, माजी आमदार मेधा कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची निर्मिती "संवाद पुणे'चे सुनील महाजन आणि निकिता मोघे यांची होती.

शिवेंद्रराजेंच्या फेसबुकपेजवरील पवारांचा उल्लेख बदलला

पाटील म्हणाले, "महाराष्ट्राची राजधानी पुणे असली तरी अनेक श्रेष्ठ कलाकारांच्या वास्तव्यामुळे कोथरूड ही पुण्याची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे असे सांस्कृतिक कार्यक्रम नियमित घेत राहू.''

या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. स्वाती दैठणकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. अमेय जोग व सहकाऱ्यांनी "आम्ही कोथरूडकर' हे गीत सादर केले. नुपूर दैठणकर यांनी नृत्यातून वसंत ऋतूच्या छटा सादर केल्या.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे उद्या पहिल्यांदाच बारामतीत

शौनक अभिषेकी यांनी पूरिया धनाश्री रागातील शिवस्तुती आणि अभंग सादर केला. ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी "पतित तू पावना' आणि "कशी केलीस माझी दैना' या रचना सादर केल्या. आनंद भाटे यांनी यमन रागातील बंदिश आणि त्यानंतर सादर केलेल्या "तीर्थ विठ्ठल' या रचनेने रसिकांना भक्तिरसाची अनुभूती आली. पंडित विजय घाटे यांचे तबला वादन आणि शीतल कोलवालकर यांच्या कथक नृत्याची जुगलबंदी रंगतदार ठरली. भार्गवी चिरमुले यांनी "तिळगुळ घ्या' आणि "पतंग' यावर सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात रंग भरले. कोथरूडच्या कलाकारांनी विविध गाणी सादर केली.

कोथरूडकरांचा सन्मान
या कार्यक्रमात प्रभाकर जोग (संगीतकार), कीर्ती शिलेदार (नाट्यसंगीत), डॉ. विश्वनाथ कराड (शिक्षण), लीला गांधी (नृत्य), अन्वर कुरेशी (गायन), सुलभा तेरणीकर (समीक्षक), हेमा लेले (कवयित्री) यांचा त्यांच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: audience appreciates amhi Kotrudkar Program in Pune