पुण्यातील 'या' परिसरातील रुग्णांसोबत हे काय घडते आहे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

अधिकाऱ्याची निष्क्रीयता; वडगाव शेरीत रूग्णांची हेळसांड सुरूच

वडगाव शेरी : उपचार मिळत नसल्याने हृदयरुग्ण असलेल्या व कोरोना बाधित झालेल्या वडिलांचा मिनिटा मिनिटाला खालावत चाललेला श्वास. या स्थितीत स्वतः कोरोना बाधित असूनही मुलाची वडीलांना वाचवण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेली धडपड आणि अशा वेळी पुणे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून व खाजगी रुग्णालयाकडून ऐकावी लागणारी उडवाउडवीची उत्तरे. व्यवस्थेविरूद्ध चीड निर्माण होईल, असा प्रसंग नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय हद्दीत काल (ता 15)  घडला.

असा चेक करा बारावीचा रिझल्ट

विशेष म्हणजे उपचारासाठी विनवनी करणाऱ्या रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जागोजागी उपकाराची भाषा ऐकावी लागत असल्याचा अनुभवही काल आला. याचा निषेध याभागतील विविध संघटनांनी केला असून कारवाईची मागणी केली आहे.

विमाननगर येथे रहाणाऱ्या एका ५७ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांनी अगोदर कोलंबीया रूग्णालय गाठले. परंतु तेथील किमती परवडणाऱ्या नसल्याने ते खराडी येथील श्री हॉस्पिटलला जाऊन पोहोचले. तेथे बाह्यरूग्ण विभागात तपासणी करून तीन हजार रूपये भरून सोमवारी (ता. 13) कोरोना चाचणी केली. त्यानंतर बुधवारचा तीसरा दिवस उजाडला. तरी कोरोनाचा अहवाल आला नव्हता. 

दरम्यान तीन दिवसात सदर व्यक्तीची तब्बेत आणखीनच खालावली. कोरोनाची लक्षणे होती मात्र रिपोर्ट मिळाला नसल्याने व ऑक्सिजन बेड नसल्याचे कारण सांगून त्यांना श्री हॉस्पीटल, रायझिंग हॉस्पिटल यांनी उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. शेवटी सदर व्यक्तीला घेऊन त्यांचा मुलगा पालिकेच्या खराडीतील कोवीड केअर सेंटरला गेला. तेथे त्यांनी रॅपीड टेस्ट केली. त्यात वडीलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर त्याचवेळी श्री हॉस्पिटलचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला. त्यांचा मुलगाही बाधित असल्याचा अहवाल आला. वडीलांची तब्बेत आणखी खालाऊ लागली. मात्र सकाळपासून उपचाराच्या प्रतिक्षेत असलेल्या सदर व्यक्तीकडे सायंकाळनंतरही कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते किंवा काय करावे सांगत नव्हते.

येरवडा कारागृहातून पाच कैदी पळाले

परिस्थिती बिकट होऊ लागल्यानंतर रूग्णाच्या नातेवाईकांनी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे, वडगाव शेरी नागरिक मंच, स्थानिक पत्रकार यांच्यामार्फत सहाय्यक आयुक्त राजेश बनकर, डॉ. रेखा गलांडे, डॉ. विजय बडे, उपायुक्त विजय दहिभाते यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावेळी पालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध बेडची माहिती अधिकार्यांना सांगण्यातही आली. मात्र ती माहिती अपडेट नसते असा अजब युक्तीवाद करीत रूग्णाला शेवटी भारती हॉस्पिटलला पाठवणार असल्याचे डॉ. बडे यांनी सांगितले. मात्र सायंकाळी साडेसात वाजले तरी रूग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. आमदार टिंगरे यांनी प्रयत्न केल्यावर रूग्णवाहीका उपलब्ध झाली व रूग्णाला भारती हॉस्पिटलला पाठवण्यात आले.

   तेथे गेल्यावर रूग्णालयात ऑक्सिजन बेड नाही. अगोदर पन्नास हजार भरा, तरच दाखल करू, अशी अट रूग्णलयाने घालून रूग्णाला अडीच तास अॅम्ब्युलन्समध्येच तिष्ठत ठेवले. नातेवाईकांनी पुन्हा उपायुक्त दहिभाते यांमार्फत सदर रूग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. उपचाराला पैसे भरावे लागतील याची कल्पना आपण आधीच खराडीतील अधिकारी डॉ. बडे यांना दिली होती अशी भुमिका भारतीच्या डॉक्टरांनी घेतली. 

या गोंधळात रात्री साडेदहा वाजता रूग्णाची स्थिती अधिकच बिघडली. शेवटी कुटुंबियांनी सकाळ प्रतिनिधीमार्फत पालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याशी संपर्क साधून सगळी हकीकत सांगितली. डॉ. साबणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता भारती रूग्णालयाशी संपर्क साधून अत्यवस्थ रूग्णाला महात्मा फुले योजनेअंतर्गत तातडीने उपाचार द्या, अशी सुचना केली. त्यानंतर रूग्णालय उपचारासाठी तयार झाले. रात्री अकरा वाजता रूग्णाला ऑक्सिजन बेड व उपचार देण्यास सुरवात झाली. डॉ. साबणे यांनी पुन्हा कुटुंबियांशी संपर्क साधून मानसिक आधारही दिला व काही मदत लागल्यास फोन करा असेही सांगितले.  

   त्यानंतर रात्री बारा वाजता रूग्णाच्या मुलास खराडीतील विलगीकरण कक्षात उपचारासाठी आणण्यात आले. 

----------

चौकट - कोरोना यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेचा व पुण्यातील खासगी रूग्णालयाच्या मनमानीचा अनुभव नागरिकांना वारंवार येत आहे. उपचारासाठी विनवनी करणाऱ्याना अधिकारी उपकार करीत असल्यासारखी भाषा वापरत आहेत. यात सुधारणा न झाल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होईल.  -कल्पेश यादव (शहराध्यक्ष, मनवीसे, पुणे)

ढिसाळ नियोजनामुळे वडगाव शेरीतील कोरोना बाधितांचा आकडा येरवड्या पुढे गेला आहे. रुग्णांशी निष्काळजीपणे वागणार्या व वर्षनुवर्षं येथे ठाण मांडून बसलेल्या काही अधिकारयांवर कारवाई होणे गरजेचे आहे -आशिष माने (वडगाव शेरी नागरिक मंच)

निष्काळजीपणामुळे सामान्य माणसाला योग्यवेळी उपचार मिळत नसतील तर जबाबदार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करावी. उपचाराभावी रुग्ण दगावतात ही पुण्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. - विशाखा गायकवाड (संजीवनी संस्था)

गरिबांना बेड मिळत नाहीत. पैसेवाल्याना मात्र अधिकारी बेड उपलब्ध करून देतात. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी वचक ठेवावा. वस्तीत जागेवर उपचार उपलब्ध करून घ्यावेत - आरती साठे (अध्यक्ष, बहुजन युवक फाउंडेशन, पुणे)

आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad condition of patients at Wadgaon Sheri