बारामतीत हनीट्रॅप! बडतर्फ पोलिसांसह सातारच्या चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Crime_Honey_Trap
Crime_Honey_Trap

बारामती : महिलांच्या मदतीने व्हॉटसअँपवर मेसेज पाठवून हनीट्रॅपमध्ये अडकवून पैसे लुबाडणा-या चौघांना शहर पोलिसांनी अटक केली. यात मुंबई पोलिस दलातील एका बडतर्फ पोलिसासह दोन महिलांचा समावेश असून विशेष म्हणजे महिला दिनी महिला पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. 

पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी महिला दिनाच्या दिवशी (ता.8) महिला कर्मचा-यांकडे पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपविला होता. बारामतीतील कमला शंकर पांडे (रा. अशोकनगर, जैन मंदीरासमोर, मयुरेश्वर अपार्टमेंट, बारामती) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी स्मिता दिलीप गायकवाड (रा. फलटण, जि. सातारा), मुंबई पोलिस दलातील बडतर्फ पोलिस कर्मचारी आशिष अशोक पवार (रा. भुईंज, ता. वाई, जि. सातारा), सुहासिनी योगेश अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण, जि. सातारा) आणि राकेश रमेश निंबोरे (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि.सातारा) या चौघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.

नामदेव शिंदे माहिती देताना म्हणाले की, आशिष पवार हा बडतर्फ पोलिस या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे, सावज हेरून स्मिता गायकवाड हिच्या मोबाईलवरुन ओळख निर्माण करुन त्यांना फलटणला बोलावून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो असे धमकावून त्यांच्याकडून पैसे लुटणे अशी यांची कार्यपध्दती होती. कमला पांडे यांच्याकडूनही त्यांनी दहा लाखांची मागणी केली होती, मात्र त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी अश्विनी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला. या सापळ्यात हे चौघेही अलगद सापडले.

यातील राकेश निंबोरे याच्यावर या पूर्वी खंडणी, दरोडा, पोलिसांवर हल्ला करणे, अपहरण असे अकरा गुन्हे दाखल असून तो आपले नाव गुरु काकडे असे सांगायचा. बारामती बसस्थानकावर वीस हजारांची खंडणी स्विकारताना पोलिसांनी राकेश निंबोरे याला ताब्यात घेतल्यानंतर इतर तिघांची नावे चौकशीत निष्पन्न झाली. त्या नंतर त्या तिघांनाही पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस कर्मचारी सागर देशमाने, अतुल जाधव, अंकुश दळवी, अजित राऊत, दशरथ इंगुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 

तक्रारदारांनी समोर यावे...
अशा काही प्रकरणात कोणाची फसवणूक झाली असल्यास न घाबरता लोकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. पोलिस त्यात कारवाई करतील, असे नामदेव शिंदे यांनी आवाहन केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com