भामा आसखेड आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा; मोठा संसर्ग होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

कोरोना रोगाची वाढती महामारी आणि खेड तालुक्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता त्याला मोठा हातभार लावणारी घटना आज खेड तालुक्यात घडली. त्याला निमित्त होते भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या जनआंदोलनाचे. शेकडोंच्या संख्येने एकत्र आलेले शेतकरी आणि त्यांना आवरण्यासाठी आलेला मोठा पोलिस बंदोबस्त यांची जणू एकत्रित यात्राच या ठिकाणी भरली होती.

आंबेठाण - कोरोना रोगाची वाढती महामारी आणि खेड तालुक्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ पाहता त्याला मोठा हातभार लावणारी घटना आज खेड तालुक्यात घडली. त्याला निमित्त होते भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या जनआंदोलनाचे. शेकडोंच्या संख्येने एकत्र आलेले शेतकरी आणि त्यांना आवरण्यासाठी आलेला मोठा पोलिस बंदोबस्त यांची जणू एकत्रित यात्राच या ठिकाणी भरली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जलवाहिनीचे काम बंद ठेवावे या मागणीसाठी आज (दि. ३१) शेकडो शेतकरी करंजविहिरे येथील धामणे फाटा आणि नंतर आसखेड खुर्द येथील जलवाहिनीचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी एकत्र आले होते.यावेळी ना शेतकरी वर्गात सोशल डिस्टनसिंग दिसले ना पोलिस दलात. काही ठिकाणी तर श्वास घ्यायला जागा नाही इतके कमी अंतर दोघांत दिसत होते. बहुतांश शेतकरी आणि काही पोलिस देखील विना मास्क वावरताना दिसत होते.

पुणे-मुंबईतील कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाइन; टाटा-सिप्लाचा उपक्रम

आधीच खेड तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांचे शतक पार होताना दिसत आहे. खुद्द महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणजे प्रांताधिकारी यांना कोरोना झाला होता तर चाकण वाहतूक पोलीसमधील एका कर्मचाऱ्याचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात फैलाव होत असताना आजची घटना काळजात धडकी भरविणारी ठरली आहे. घोळक्याने जमा झालेले आंदोलक आणि त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले पोलिस यांच्यातील निष्काळजीपणा आज स्पष्ट दिसत होता.

- समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

आंदोलकांना अटक केल्यानंतर त्यांना चाकण येथे नेण्यासाठी जी वाहने होती ती खचाखच भरून नेली जात होती. एखादया लग्नातील वऱ्हाडी वाहणाऱ्या वाहनाप्रमाणे या गाड्या भरून नेल्या जात होत्या. या गर्दीत कोणाला कोरोनाचा लागण झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल असे आंदोलक वारंवार सांगत होते. परंतु ना महसूल, ना पोलीस, ना महानगरपालिका प्रशासन त्यांच्या या मागणीकडे लक्ष देत होते. आंदोलकांना चाकण येथे नेल्यानंतर देखील त्यांना एका कार्यालयात एकत्र ठेवण्यात आले होते.

एकंदरीत आजच्या आंदोलनात सोशल डिस्टनसिंगचे वाजलेले तीन तेरा पाहता तालुक्यात कोरोना रुग्णाची मोठी लाट येण्याची शक्यता असून शेतकऱ्यांसह प्रशासनाला आणि पोलिसांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhama aaskhed agitation social distencing issue corona virus