लॉकडाउन पुण्यात...पण या तालुक्यांत होणार नियमांची कडक अंमलबजावणी

किरण भदे
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे शहरातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहराला लागून असलेल्या भोर व वेल्हे तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती भोरचे प्रांत तथा इनसिडंट कमांडर आॅफिसर राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.

नसरापूर (पुणे) : पुणे शहरातील लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर शहराला लागून असलेल्या भोर व वेल्हे तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती भोरचे प्रांत तथा इनसिडंट कमांडर आॅफिसर राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.

जुन्नरमधील नागरिकांवर दहा दिवस आहेत ही बंधने 

लॉकडाउन शिथिल झाल्या पासून व कंपन्या- उद्योगधंदे सुरू झाल्यापासून भोर व वेल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातील बहुतेक रुग्ण हे पुणे शहराच्या संपर्कातूनच बाधीत झाले आहेत. पुणे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर झाल्याने शहराशेजारील तालुक्यामध्ये देखिल प्रसार रोखण्यासाठी काही प्रभावी पावले उचलणे गरजेचे झाल्याने प्रांतअधिकारी राजेंद्र जाधव यांनी प्रसार रोखण्यासाठी  नियमांची कडक अमंलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भोर तालुक्यात आतापर्यंत 73 कोरोनाबाधित अढळले, तर वेल्हे तालुक्यात आतापर्यंत 38 कोरोनाबाधीत आढळले आहेत. पुणे येथे दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर झाल्याने गावाकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गावाकडे प्रसार वाढू नये, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. याबाबत प्रांताधिकारी जाधव यांनी सांगितले की, पुणे शहराप्रमाणे भोर व वेल्हे तालुक्यात लॉकडाउन जाहीर केला जाणार नाही, परंतु प्रसार रोखण्यासाठी या दिवसात यंत्रणा जाणिवपूर्वक प्रयत्न करणार आहे. कोठेही संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. जिथे उल्लंघन होत आहे, तिथे त्वरीत कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे, विनाकारण फिरणारे यांच्यावर करडी नजर ठेवून कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे जे नियम केले आहेत, त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल.

बारामतीकरांनो सावधान, आता तुमच्यासमोर आहे हो मोठा धोका...  

भोरचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले की, पुणे किंवा इतर ठिकाणाहून गावाकडे येणाऱ्या सर्व नागरिकांची माहिती गावपातळीवरील तलाठी, पोलिस पाटील, सरपंच यांच्या समिती घेणार असून, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याच्या सूचना गावपातळीवरील समितीला देण्यात आल्या आहेत. तसेच, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यकांत करहाळे यांनी सांगितले की, ज्या गावांमध्ये रुग्ण सापडले आहेत, त्या गावांमध्ये प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्याचे काम आरोग्य पथकांनी चालू केले आहे. जे संशयीत वाटतील, त्यांची तातडीने कोरोना तपासणी करण्यात येईल.

एकंदर भोर व वेल्हे तालुका प्रशासनाने देखिल कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही तालुके कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही. मात्र त्यासाठी नागरिकांनी गांभीर्याने याकडे पाहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhor and Velhe talukas will have strict implementation of lockdown rules