BHR घोटाळा प्रकरण : पाच आरोपींविरोधात अडीच हजार पानांचं चार्जशीट दाखल

BHR
BHR

पुणे - भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणात अटक केलेल्या पाच संशयित आरोपींविरुद्ध पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी न्यायालयात अडीच हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले. 61 कोटी 90 लाख 88 हजार रुपयांचा अपहार, फसवणुकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी यापुर्वी अटक केली आहे.

सनदी लेखापाल महावीर जैन, एजंट विवेक ठाकरे, धरम सांखला, चालक कमलाकर कोळी व सुजित वाणी या पाच संशयित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी कमलाकर काळी हा जामीनावर मुक्त असून अन्य चार जण येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करीत 89 दिवशी तपास पुर्ण करुन अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोप सादर केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने 27 नोव्हेंबर 2020 रोजी जळगावात छापेमारी करुन महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे, संगणक जप्त करुन सहा संशयितांना अटक केली. यानंतर 22 जानेवारी रोजी मुख्य संशयित सुनिल झंवर याचा मुलगा सुरज यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयित आरोपींनी संगनमत करुन, कट रचुन प्रशासकीय काम करण्याऐवजी स्वतःच्या तसेच काही लोकांच्या आर्थिक फायद्याच्या उद्देशाने अपहार व फसवणूकीचा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. जैन यास "बीएचआर' पतसंस्थेचे फॉरेन्सीक ऑडीट करण्यासाठी लेखापरीक्षक म्हणून नेमले होते. त्याने आर्थिक घोटाळा उघडकीस आणणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षात मात्र त्यानेच खोटी कागदपत्रे बनवून ती ठराविक लोकांचा फायदा होईल, यासाठी प्रयत्न केले. होते. तर कोळी हा तत्कालिन अवसायक जितेंद्र कंडारे याचा वाहनचालक होता. त्याने मुख्य संशयित झंवर, कंडारे यांना पळुन जाण्यास मदत केली आहे. तर धरम सांकला व वाणी हे दोघेही पतसंस्थेचे कर्मचारी होते. त्यांच्याकडे पतसंस्थेतील खाते सांभाळण्याची जबाबदारी होती, असे असूनही त्यांनी ठेवीदारांची दिशाभुल करून त्यांच्यात भिती पसरविली.

तसेच ठेवीदारांचे नुकसान करून कर्जदारांचा फायदा करून घेतला. तर ठाकरे हा स्वतः पतसंस्थेचा मोठा थकबाकीदार होता, तसेच तो पावती एजंटही होती. त्याच्यावर अडीच ते तीन कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज फेडलेले नसताना त्याने पावजी एजंटचे काम केले. ठेवीदारांमध्ये भीती निर्माण ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये 15 ते 35 टक्के इतकी रक्कम घेऊन पैशांचा अपहार केला. आरोपींनी "बीएचआर'च्या ठेवीदारांऐवजी कर्जदारांचा कसा फायदा होईल यासाठी काम केले. त्यामुळे ठेवीदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचे दोषारोपात नमूद केले आहे. पोलिसांनी मंगळवारी या गुन्ह्याचे दोषारोप सादर केले.यावेळी सरकारी वकील प्रवीण चव्हाण, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके, पोलिस निरीक्षक सुचिता खोकले, त्रयस्त अर्जदार ऍड. अक्षता नायक उपस्थित होते.

पोलिसांकडून पुणे, जळगावसह पाच ठिकाणच्या मालमत्ता जप्त
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापुर्वी "बीएचआर'च्या पुण्यातील घोले रस्ता, निगडी, आंबेगाव बुद्रुक व पिंपरी-चिंचवड, जळगाव जिल्ह्यातील जामनेर अशा ठिकाणच्या पाच मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांची किंमत बाजारभावाप्रमाणे 48 कोटी 56 लाख इतकी आहे. तर संशयित आरोपींनी ही मालमत्ता त्यांच्या जवळील व्यक्तींना केवळ 7 कोटी 45 लाख रुपयांनाच विक्री केल्याचा ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

निविदा प्रक्रियेसाठीची संगणक प्रणालीच स्वतःसाठी अनुकूल करीत केला अपहार
संशयित आरोपींनी परराज्यातील कुणाल शहा या संगणक प्रणाली निर्मिती करणाऱ्याकडून निवीदा प्रक्रियेसाठीची स्वतंत्र प्रणाली घेतली. या प्रणालीमुळे निविदा प्रक्रियेसाठी कितीही जणांनी अर्ज केले, तरीही त्यामध्ये आरोपींशी संगनमत असलेल्या व्यक्तींचीच नावे येत होती. हि निवीदा प्रक्रिया केवळ 10 ते 12 व्यक्तींनाच दिसून येत होती. थेट निवीदा प्रक्रियाच अनुकूल करून घेत कोट्यावधी रुपयांचा अपहार केला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com