कोरोनाची लस लोकांपर्यंत पोचविण्याचे आव्हान; जिल्हा प्रशासन लागले कामाला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

कोरोनावर लस उपलब्ध झाल्यानंतर ती जनतेपर्यंत पोचवणे एक मोठे आव्हान राहणार आहे. ही लस आरोग्य व्यवस्थेमार्फत जनतेपर्यंत पोचणार आहे.

पुणे : कोरोना आजारावरील लस उपलब्धतेनंतर ती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी प्राधान्य घटक ठरवून लशींची मागणी, पुरवठा आणि लस देण्याच्या व्यवस्थेबाबत मार्गदर्शक सूचना निश्‍चित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. 

दिवाळीनिमित्त गावी जाताय; पुण्यातून सुटणार एसटीच्या जादा गाड्या!​

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोनावर लस उपलब्ध झाल्यानंतर ती जनतेपर्यंत पोचवणे एक मोठे आव्हान राहणार आहे. ही लस आरोग्य व्यवस्थेमार्फत जनतेपर्यंत पोचणार आहे. त्यामुळे ही लस देताना आरोग्य यंत्रणेतील घटकांचे कोरोनापासून संरक्षण करणे आवश्‍यक आहे. यामुळे प्राधान्याने आरोग्य व्यवस्थेतील सर्व घटकांना ही लस देणे आवश्‍यक आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे. या घटकांना लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून पुढील लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेत सुमारे एक लाख 10 हजार विविध घटक कार्यरत आहेत. या अनुषंगाने प्रशिक्षण, लसीकरणासाठी साधन सामुग्री आणि आवश्‍यक मनुष्यबळांबाबत आढावा घेण्यात येत आहे. 

Pune ZP: स्थायी समितीवर आमले, जगदाळे बिनविरोध; अंकिता पाटील अर्थ समितीवर​

कोरोना लसीकरणासाठी प्राधान्याने निवड करण्यात आलेल्या घटकांमध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व कर्मचारी, वैद्यकीय अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, प्रयोगशाळा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसह आदींचा समावेश असेल.

विद्यार्थी आणि पालकांनो, यंदा दिवाळीची सुट्टी फक्त पाचच दिवस!​

खबरदारी न घेतल्यास पुन्हा दुसरी लाट : 
युरोप तसेच दिल्ली, केरळ राज्यात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असून, ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. आवश्‍यक खबरदारी न घेतल्यास आपल्याकडेही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील काळात लस उपलब्ध होईपर्यंत सर्वांनी सतर्क राहून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्‍यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big challenge to make corona vaccine available to public once it becomes available said District Collector Dr Deshmukh