विद्यार्थी आणि पालकांनो, यंदा दिवाळीची सुट्टी फक्त पाचच दिवस!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

शैक्षणिक दिनदर्शिकेत उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सगळ्यात जास्त दिवसांची सुट्टी दिवाळीत मिळत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. मात्र यंदा ही संधी हुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणे : दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, पणत्या रंगविणे आणि लावणे, आकर्षक सजावट यामध्ये बच्चे कंपनी दंग होऊन जाते. सकाळ-संध्याकाळ फराळावर ताव मारत भावंडे, दोस्तांबरोबर धम्माल सुरू असते. मात्र यंदा राज्यातील शाळांना केवळ पाचच दिवस दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी मिळणार असल्याने विद्यार्थी-पालक यांच्यासह शिक्षक वर्गातूनही नाराजीचा सूर उमटत आहे.

दहावीतील मुलीचं इंग्लिश ऐकून शशि थरूर निशब्द; विचारलं,'अर्थ काय?'​

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात अजूनही शाळा बंद आहेत. मात्र जूनपासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे घरातूनच शिक्षण सुरू होते. यंदाची उन्हाळ्याची सुट्टीदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरात बसूनच गेली. त्यात विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे मजा करता आली नाही. शैक्षणिक दिनदर्शिकेत उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सगळ्यात जास्त दिवसांची सुट्टी दिवाळीत मिळत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. मात्र यंदा ही संधी हुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Lockdown Effect : फक्त ३० टक्केच हॉटेल्स सुरू; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सद्यस्थिती​

दरवर्षी किमान दहा ते पंधरा दिवस दिवाळीची सुट्टी असते. परंतु यंदा शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रम पूर्ण करायचा असल्यामुळे १२ ते १६ या कालावधीत दिवाळी असल्याने त्याच कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहिल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार शैक्षणिक वर्षात सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, तसेच शाळांमध्ये एकूण २३० दिवस काम होणे आवश्यक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान दोनशे, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांचे कामाचे दिवस किमान २२० होणे गरजेचे आहे. यानुसार शाळांना यंदा दिवाळीच्या पाच दिवसांच्या सुट्ट्या दिल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे.

माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक अन् सुटका

"कोरोनाच्या संसर्गामुळे मुलांना उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद हवा तसा घेता आला नाही. सध्या हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. 'न्यू नॉर्मल' मध्ये आवश्यक काळजी घेऊन सूटीचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट, पर्यटन स्थळे असे अनेक पर्याय खुले झाले आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे दहा-बारा दिवसांची दिवाळीची सूटी ग्राह्य धरून नियोजन केले होते. परंतु शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिवाळीची केवळ पाच दिवस सूटी दिल्यामुळे यापूर्वी केलेले सूटीचे नियोजन बदलावे लागणार आहे."
- सुप्रिया पवार, पालक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra govt decided to give only five days of Diwali holiday to schools in state