esakal | केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात कोरोनाचा मोठा उद्रेक

बोलून बातमी शोधा

nana patole
केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात कोरोनाचा मोठा उद्रेक
sakal_logo
By
गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना ही राष्ट्रीय महामारी असून या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठीचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही जबाबदारी झटकत आहेत. त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी घेतलेल्या चुकीच्या धोरणामुळेच देशात कोरोना मोठा उद्रेक झाला आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे निरापराध व्यक्तींचे कोरोनाने मृत्यू होऊ लागले आहेत. हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत द्यावी, अशी मागणीही पटोले यांनी शनिवारी (ता.२४) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

हेही वाचा: लॉकडाऊनमध्येही बेशिस्त वर्तणूक कायम; १९ दिवसात २५.७६ लाखाचा दंड वसूल

जगातील ज्या देशांनी आपापल्या देशातील ७० ते ८० टक्के नागरिकांचे लसीकरण केले, ते देश कोरोनामुक्त आणि लॉकडाऊनमुक्त झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन, त्याच्या प्रतिबंधासाठीचे योग्य नियोजन करायला हवे होते. पण प्रत्यक्षात त्यांनी ते नियोजन केले नाही. त्यामुळेच सध्या देशात निरपराध नागरिकांचे कोरोनाने मृत्यू होऊ लागले आहेत, असा आरोपही पटोले यांनी यावेळी केला.

देशातील कोरोना प्रतिबंधासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन शनिवारी (ता.२४) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पटोले यांनी दिले. राव यांनी हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवावे, अशी मागणी पटोले यांनी राव यांच्याकडे केली.

यावेळी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, आबा बागुल, अभय छाजेड, अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; उपराजधानीत युवकाला अटक

पटोले म्हणाले, " कोरोना महामारीच्या काळात देशातील सर्व जनता आपलीच आहे, असे समजून सर्वांना मोफत लस द्यायला हवी होती. केंद्र सरकारने केवळ दोन कंपन्याना लस निर्मितीची परवानगी देऊन मोनोपॉली करायला संधी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसाठी केंद्र, राज्य आणि खासगी हॉस्पिटलला वेगवेगळ्या दरामध्ये लस खरेदी करावी लागणार आहे. याला काॅग्रेसचा विरोध आहे. पाकिस्तानसारख्या देशाला मोफत लस दिली. मग आपल्याच देशातील जनतेला ती विकत घ्यावी का लागते आहे."

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना हे चूक

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या प्रामाणिकपणे नोंदी करण्यात येत आहेत. सर्व रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची आकडेवारी जास्त दिसते आहे. अन्य राज्यात नोंदी केल्या जात नाहीत. त्यामुळे तेथे आकडेवारी दिसत नाही. प्रत्यक्षात तेथे महाराष्ट्रापेक्षा भीषण स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत, हे वाक्य चुकीचे असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा: केंद्राचा मोठा निर्णय; आयात होणाऱ्या लस, ऑक्सिजनवरील कर माफ