पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान, शिवापूर, कोरेगावला झोडपले

haveli
haveli

पुणे : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना मंगळवारी (ता. ३) झालेल्या चक्री वादळाचा मोठा फटका बसला. तसेच, खेड शिवापूर  परिसराला गुरुवारीही जोरदार पावसाने झोडपले. कोरेगाव भीमा परिसात पत्रे उडाले, विजेच्या तारा तुटल्या. 

लोणी काळभोर (पुणे) : पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांना मंगळवारी (ता. ३) झालेल्या चक्री वादळाचा मोठा फटका बसला. उरुळी कांचन, लोणी काळभोर, शिंदवणे, कोलवडीसह हवेलीच्या पूर्व भागात केळी, फळबागा, फुलशेती, भाजापाला वादळाच्या तडाख्यामुळे जमिनदोस्त झाला आहे. केळी, टोमॅटो, फुलशेती, भाजीपाला व ऊस यासारख्या प्रमुख पिकांचे झालेले नुकसान सुमारे चार कोटीचे झाल्यांचा अंदाज आहे. 

कोरोनामुळे मागिल दोन महिन्यापासून गुलटेकडी (पुणे) येथील बाजार समिती बंद आहे. त्यामुळे पूर्व हवेलीमधील शेतकरी अगोदरच मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. या संकटातून सावरत असतानाच चक्री वादळासारख्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पु्र्व हवेलीत मंगळवारी दुपारी तीननंतर अचानक जोराचे वारे सुरु झाले. त्यामुळे कोलवडी, थेऊर, शिंदवणे या प्रमुख गावांतील दोनशेहून अधिक एकरावरील केळीच्या बागा भूईसपाट झाल्या. सोरतापवाडी या गावाची ओळख ही फुलांचे गाव म्हणून आहे. एकट्या सोरतापवाडीच्या हद्दीत हजारो एकर फुलशेती केली जाते. या चक्री वादळामुळे सोरतापवाडी गावातील सत्तर टक्क्यांहुन अधिक फुलशेती भईसपाट झाली आहे. ऊस, टोमॅटो, फ्लॉवर व इतर भाजीपाल्याचेही अतोनात नुकसान झाले आहे. 

शिंदवणे व आळंदी म्हातोबाची येथील केळी व उसाचे पीक भूईसपाट झाले आहे, तर पेरू, डाळिंबाच्या बागेच्या कळ्या गळून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडलेले आहेत. ते तत्परतेने बसविण्याचे काम चालले आहे. शिंदवणे गावात गणपत कड, यशवंत शितोळे, आनंद शितोळे, रमेश महाडिक, प्रकाश महाडिक यांचअयासह अनेक अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 
आळंदी म्हातोबाची येथे आंबा, सिताफळ, डाळिंबाच्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत. जोरदार वाऱ्याममुळे शेवग्याची झाडे मधून तुटली आहेत. पालेभाज्यांना छिद्रे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आळंदी म्हातोबाची येथील लक्ष्मण भोंडवे, साहेबराव जवळकर, परसराम जगताप, कुंडलिक व बबन जवळकर अशा अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कोलवडी येथे केळीसह ऊस पिकाचे नुकसान मोठे झाले आहे. येथील शंकर देवराव ससाणे, रावसाहेब गायकवाड, प्रल्हाद शितोळे, रोहित शितोळे, पुण्यवंत शितोळे, यशवंत शितोळे, नवलसिंग शितोळे या प्रमुख शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

पंचनामे पुढील तीन दिवसांत
वादळामुळे पूर्व हवेलीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्यात आले आहेत. मंडल अधिकारी, तलाठी व महसूल खात्याचे कर्मचारी पुढील तीन दिवसात पंचनामे पूर्ण करणार आहेत. पंचनामे पूर्ण होताच पूर्व हवेलीमधील नुकसानीचा नेमका आकडा मिळणार आहे, अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली. 

भरपाईसाठी प्रयत्न करणार : आमदार पवार प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचे सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसूल खात्याला दिले असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे, असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

खेड शिवापूर परिसराला झोडपले
खेड शिवापूर :
परिसराला गुरुवारीही जोरदार पावसाने झोडपले. या वेळी वारा नव्हता, मात्र पाऊस जोरदार होता. शिवापूर (ता. हवेली) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारील कर्मचाऱ्याच्या निवासस्थानाचे पत्रे बुधवारी सायंकाळी उडाले. वेळू (ता. भोर) येथे बुधवारी आलेल्या वादळात अशोक आणि निरगिलीचे कोसळले. तसेच, वेळू येथील गुलाब घुले यांच्या शेतातील आंबा पिकाचे बुधवारी आलेल्या वादळात नुकसान झाले. खोपी (ता. भोर) गावात चिंचेच्या झाडांची संख्या जास्त आहे. मात्र, दोन दिवस झालेल्या वादळ आणि पावसाने चिंचेच्या झाडांचा बहर गळून गेला आहे. त्यामुळे येथील चिंचा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

कोरेगावात पत्रे उडाले, पेरण्यात वीज खंडित  कोरेगाव भीमा : येथे काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने राजेंद्र काशिद यांच्या श्रीराम कटींग सलून या दुकानाचे पत्रे उडून नुकसान झाले. तसेच, नगर रस्त्यालगतची अनेक होर्डींग फाटली. पूर्व हवेलीत 
पेरणे वीज केंद्राअंतर्गत पाच लघू, तर पाच उच्च दाबाच्या खांबांचे नुकसान झाले. यात पिंपरी सांडस येथे झाडे पडून दोन ठिकाणी वीजवाहिन्याचे नुकसान झाले. यातील ९० टक्के दुरूस्तीची कामे पूर्ण करण्यात आल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले. वाघोली- केसनंद रस्त्यावर एक मोठी कमानही रस्त्यावर कोसळली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com