esakal | पानसरेवाडीत आढळले चार लांडोर व पक्षी मृतावस्थेत

बोलून बातमी शोधा

birds death
पानसरेवाडीत आढळले चार लांडोर व पक्षी मृतावस्थेत
sakal_logo
By
जयराम सुपेकर, सुपे

सुपे ः पानसरेवाडी (ता. बारामती) परिसरातील एका शेतात चार लांडोर व काही पक्षी मृतावस्थेत आढळून आले. या पक्षांचे शवविच्छेदन केले असून, त्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या अहवालानंतरच हे पक्षी कोणत्या कारणाने मृत झाले ते समजणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: पुणे महापालिका रुग्णालयांसाठी ८०० रेमडेसिव्हिर

मंगळवारी दुपारी पानसरेवाडीच्या एका शेतात चार लांडोर व काही चिमणी वर्गीय पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वन परिमंडळ अधिकारी ए.बी.पाचपुते यांनी दिली. मृत पक्षांचे शवविच्छेदन मोरगाव येथे करण्यात आले. त्याचे नमुने भोपाळ येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुण्यातील औंध येथील पशुरोग अन्वेशन विभाग व विषनिदान प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पाचपुते यांनी सांगितले. मृत पक्षी आढळले त्या परिसरात तपास चालू असून, अद्याप संशयास्पद काही दिसून आले नसल्याचे त्यांनी सांगितले. पशुधन विकास अधिकारी डॉ. अरूण महाकाळ, डॉ. औदुंबर गावडे, डॉ. अजय सुपे, डॉ. महेंद्र सरोदे आदींच्या पथकाने शवविच्छेदनाचे काम केले. यावेळी मोरगावच्या वनरक्षक शकुंतला गोरे, वन कर्मचारी गणपत भोंडवे, शिवाजी दिवटे, सोमनाथ जाधव उपस्थित होते. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बारामतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपुते तपास करत आहेत.

याविषयी कात्रजच्या वन्यप्राणी अनाथालयाचे प्रमुख डॉ. अनिल खैरे म्हणाले, ''मृत पक्षांचे शवविच्छेदन नमुने उद्या येतील. त्यानंतर प्रयोग शाळेच्या तपासणीनंतरच नेमके कारण कळेल. पुण्यातील दिघीजवळ कावळे मृतावस्थेत आढळत आहेत. याविषयीही शवविच्छेदनाच्या नमुना तपासणीनंतरच नेमके कारण कळेल.''

हेही वाचा: कोरोना रुग्णाची थट्टा; नगरसेविका पतीची चमकोगिरी! प्रकरण अंगलट