esakal | कोरोना रुग्णाची थट्टा; नगरसेविका पतीची चमकोगिरी! प्रकरण अंगलट

बोलून बातमी शोधा

covid center

कोरोना रुग्णाची थट्टा; नगरसेविका पतीची चमकोगिरी! प्रकरण अंगलट

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : कोरोना महामारीत सध्या बरेच जण खऱ्या अर्थाने मदत करीत आहेत. मात्र, सिडकोतील नगरसेविकाच्या पतीने ऑक्सिजनने भरलेले सिलिंडर दिल्याचा खोटा दावा करत रुग्णांच्या नातेवाइकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र, हे प्रकरण संबंधिताच्या चांगलेच अंगलट आले आहे. याबाबत रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली असून, घटनेची दिवसभर कोविड सेंटरमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

दिवसभर कोविड सेंटरमध्ये चांगलीच चर्चा

संभाजी स्टेडियमवरील कोविड केअर सेंटरमध्ये एक महिला उपचार घेत आहे. त्यांना ऑक्सिजन लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार त्यांच्या नातेवाइकांनी गोविंद घुगे यांच्याकडे रिकामे सिलिंडर भरून आणले. उरलेले ऑक्सिजन सिलिंडर श्री. घुगे यांना परत केले. यापूर्वी श्री. घुगे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांसमवेत सिलिंडरसह फोटोसेशन केले व आपण या कुटुंबीयांना ऑक्सिजन दिल्याचा खोटा दावा फोटोसह सोशल मीडियावर केला. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाइकांनी ‘सकाळ’शी संपर्क साधत हकीगत सांगून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. थोडक्यात काय तर रुग्णांच्या नातेवाइकांनी श्री. घुगे यांचा ऑक्सिजन दिल्याचा दावा फोल ठरविला आहे. त्यामुळे घुगे यांचे रुग्णाला ऑक्सिजन दिल्याचा दावा करण्यामागे नेमके कारण तरी काय, या संदर्भात सध्या सिडकोत चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

आमचे कोरोनाबाधित रुग्ण सध्या संभाजी स्टेडियम येथे उपचार घेत आहे. दरम्यान, आमच्या बंधूंनी रिकामे सिलिंडर भरून आणले. गोविंद घुगे यांनी आपण ऑक्सिजन दिल्याचा खोटा दावा करत फोटोसेशन करून व्हायरल करणे चुकीचे होते.

-अमोल सोनवणे, रुग्णाचे नातेवाईक

हेही वाचा: दोन तासांत शुभमंगल! कोरोनामुळे झटपट विवाहाचा ट्रेंड

रुग्णाच्या नातेवाइकांना एचआरसीटीसाठी आर्थिक मदत केली. तसेच सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचे बदनामीकारक फोटो अगर मजकूर देण्यात आलेला नाही. त्यांचा तो गैरसमज झाला असावा. रुग्णांसाठी काही दिवसांपासून जेवण व ऑक्सिजन देऊनही आरोप होत असेल, तर याला काय म्हणायचे?- गोविंद घुगे, भाजप नगरसेविकेचे पती