मुसळधार पावसाचा बळी; जोरदार पाण्याचा प्रवाह आला आणि 'तो' वाहून गेला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

निमित हा दुचाकीवरून चंदऩ़नगरच्या दिशेने जात होता. हॉटेल कावेरी जवळ पुणे नगर महामार्गावरून जोरदार पाणी वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे तो ओढ्याच्या दिशेने वाहून गेला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 

वाघोली :  शहरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे नगर महामार्गावरून जोरदार पाणी वाहत होते. या पाण्यात दुचाकीवरील तरुण वाहून गेल्याची घटना वाघोलीतील कावेरी हॉटेल जवळ बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. दोन महिला मात्र वाचल्या. चार ते पाच दुचाकीही वाहून गेल्याचे कळते. बुजलेले ओढे नाले व पीएमआरडीएचा हलगर्जीपणा या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी केला आहे.

पुण्यात मुसळधार पावसाचा पोलिसांनाही फटका; चंदननगर पोलिस स्टेशन रात्रभर पाण्यात

निमित अशोक अहेरवाल (वय 21 वर्षे, रा. सणसवाडी  ) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार, निमित हा दुचाकीवरून चंदऩ़नगरच्या दिशेने जात होता. हॉटेल कावेरी जवळ पुणे नगर महामार्गावरून जोरदार पाणी वाहत होते. या पाण्याच्या प्रवाहामुळे तो ओढ्याच्या दिशेने वाहून गेला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. चार ते पाच दुचाकी अशाच प्रकारे वाहून गेल्याचे कळते. सकाळी त्या तरुणाचा मृतदेह तसेच दुचाकी पुढे काही अंतरावर आढळून आल्या. काही दुचाकी मालकांनी आपल्या दुचाकी सकाळी काढून नेल्याचे समजते.

वाघोलीत पुणे नगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे तीन ते चार ठिकाणी जोरदार पाणी वाहते. यामुळे वाहतूकही ठप्प होते. दर पावसानंत हे चित्र असते. या परिसरातील बुजलेले ओढ्या नाल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवत आहे. ओढे नाले बुजविणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक वारंवार करतात मात्र पीएमआरडीए व संबांधित विभागाकडून नागरिकांच्या हाती निराशा येते.

दोन महिला वाचल्या
निमित हा मावशी व अन्य एका महिलेला स्टेशनवर सोडण्यासाठी दोघींना दुचाकीवर घेऊन जात होता. त्याची मावशी व अन्य दोघे जण गावी जाणार होते. त्याच्या दुचाकीच्या मागेच त्याचे दाजी काही अंतरावर दुसऱ्या दुचाकीवर होते. हॉटेल कावेरी जवळ आल्यानंतर त्याने त्या महिला दुचाकीवरून उतरविले. तुम्ही चालत या मी दुचाकीवर पुढे जातो असे तो म्हणाला. त्या महिला उतरल्या. तो मात्र पाण्याच्या अती प्रवाहामुळे वाहून गेला. तो सनसवाडी येथे आपली आई व बहिणी सोबत राहत होता. तो अविवाहित होता. अशी माहिती त्याचे दाजी सुभाष चौधरी यांनी दिली.

देव तारी त्याला कोण मारी! सोनाई संचालक किशोर माने यांना पाण्यातून काढले सुखरुप बाहेर

तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत कोण ? 
''ओढे नाले बुजविणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नाही. या हलगर्जीपनाचाच हा तरुण बळी पडला. या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार कोण? अधिकारी व ओढे बुजविणारे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. आणखी किती बळी गेल्यानंतर पीएमआरडी ला जाग येईल ?''
- सर्जेराव वाघमारे, पंचायत समिती सदस्य

दुचाकींचे नुकसान
ओढ्याच्या पाण्यात दुचाकी वाहून गेल्या. त्या सापडल्या असल्या तरी त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कोरोना व लॉकडॉउनमुळे आर्थिक कंबरडे मोडले. त्यात आता पुन्हा हे नुकसान यामुळे नागरिक हवालदिल झाले आहे.
 

आणखी वाचा - दगडूशेठ हलवाई मंदिरसमोर वाहत होते पाणी, पाहा व्हिडिओ

आणखी वाचा - पावसाने उडवली पुणेकरांची झोप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy dies after being swept away in canal by heavy water in Wagholi